अवनी वाघिणीचा बछडा बेपत्ताच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 06:00 AM2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:00:09+5:30
राळेगाव, केळापूर, घाटंजी तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये दहशत निर्माण केलेल्या अवनी या पट्टेदार वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास बोराटी जंगल परिसरात वन खात्याच्या असगरअली या शार्पशूटरने टिपले. दुसºया वाघिणीच्या मुत्राचा शोध घेत वाघडोटा पुलाजवळ आली असता तिला नेम धरुन गोळी मारण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार करणाऱ्या अवनी या पट्टेदार वाघिणीची वन खात्याच्या खास निमंत्रित शार्पशूटरने गोळी झाडून हत्या केली होती. या घटनेला २ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अवनीचा तो थरार, शिकार याबाबींना उजाळा मिळाला आहे.
राळेगाव, केळापूर, घाटंजी तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये दहशत निर्माण केलेल्या अवनी या पट्टेदार वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास बोराटी जंगल परिसरात वन खात्याच्या असगरअली या शार्पशूटरने टिपले. दुसºया वाघिणीच्या मुत्राचा शोध घेत वाघडोटा पुलाजवळ आली असता तिला नेम धरुन गोळी मारण्यात आली. त्यानंतर अवनीच्या दोन्ही बछड्यांच्या शोधार्थ वन खात्याने मोहीम राबविली. त्यापैकी एक बछडा वन खात्याच्या हाती लागला असून त्याला पेंच व्याघ्र प्रकल्पात सुरक्षित सोडण्यात आले. त्याचे वय दीड वर्ष असावे असा वन खात्याचा अंदाज आहे. अवनीचा दुसरा बछडा मात्र अद्यापही वन खात्याच्या हाती लागला नाही. त्याचे लोकेशनही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. १३ शेतकरी-शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या अवनीच्या शोधार्थ हत्ती व पॅराग्लायडिंगची मदत घेण्यात आली होती. अवनी नसली तरी अन्य वाघांची टिपेश्वर व परिसरातील गावांमध्ये दहशत कायम आहे.
खर्चाच्या आकड्यांचा संभ्रम अजूनही कायम
अवनीला ठार मारण्याचा खर्च दोन ते अडीच कोटी असल्याचे सांगितले जात आहे. वन खाते मात्र हा आकडा अवघा ७० लाख सांगत आहे.
ठार मारलेल्या अवनीच्या दोन बछड्यांपैकी एका बछड्याला पकडून त्याला नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. परंतु दुसऱ्या बछड्याचा अद्यापही शोध लागला नाही. गेल्या ५ जुलै रोजी कक्ष क्रमांक ७५२ मध्ये तो आढळून आला. त्याचे पगमार्कही दिसून आले. परंतु त्यानंतर मात्र हा बछडा दिसला नाही. अवनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ७० लाख रूपयांचा खर्च आला.
- के.अभर्णा, उपवनसंरक्षक
पांढरकवडा वनविभाग