नरभक्षक वाघिणीला नाईलाजाने घातली गोळी, शार्प शूटर नवाबची स्पष्टोक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 08:28 PM2018-11-14T20:28:17+5:302018-11-14T20:35:11+5:30

आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणा-या नरभक्षक वाघीण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली.

avni tigress shot dead, sharp shooter Nawab | नरभक्षक वाघिणीला नाईलाजाने घातली गोळी, शार्प शूटर नवाबची स्पष्टोक्ती 

नरभक्षक वाघिणीला नाईलाजाने घातली गोळी, शार्प शूटर नवाबची स्पष्टोक्ती 

Next

यवतमाळ : आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणा-या नरभक्षक वाघीण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला. मात्र तिने थेट झडप घातल्याने आमच्या सोबतच्या इतरांचे संरक्षण करण्यासाठी नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली, अशी स्पष्टोक्ती हैदराबाद येथील शार्प शूटर नवाब शहाफत अली खान यांनी दिली. 
राळेगाव-पांढरकवडा तालुक्यातील वाघग्रस्त अनेक गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मंगळवारी रात्री सावरखेड येथे नवाब व त्याच्या मुलाचा जाहीर सत्कार घेतला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नवाबने उपरोक्त भूमिका मांडली. सत्काराला उत्तर देताना शार्प शूटर  शहाफत अली खान म्हणाले, मीदेखील प्राणीमित्रच आहे. मानवाप्रमाणे वन्यप्राण्यांचाही प्राण आहे. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. मी आजपर्यंत अनेक ठिकाणी वाघांना बेशुद्धदेखील केले. अवनीलासुद्धा सुरुवातीला ट्रॅक्यूलाईझ डॉट मारला. आता १५ ते २० मिनिटांनी ती बेशुद्ध होईल असे वाटले. पण ती अधिक आक्रमक झाली. अवनी झुडूपात लपली. आम्ही पाळतीवर होतो. अशातच तीने आमच्या जिप्सीवर हल्ला केल्याने शेवटच्या क्षणी आमचे प्राण धोक्यात येणार होते. आम्ही रक्षणार्थ गोळी झाडली. मात्र गोळी झाडताना प्रचंड वेदना झाली. तथापि नाईलाज होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडिया, राजकीय मंडळी, पक्ष व वन्यजीव प्राणी मित्र आदी नरभक्षक अवनी वाघीणीस का मारले, असा जाब सरकारला विचारत असताना वाघीणग्रस्त परिवारातील ग्रामस्थांनी वाघीणीला ठार करणा-या शार्प शूटर  शहाफत अली खान व त्यांचा मुलगा अजगर अली खान व इतरांचा जाहीर सत्कार केला. सोबच एवढे दिवस वाघ शोध मोहीमेवर असलेले व वनकर्मचा-यांसोबत दिवाळी साजरी केली आहे. ग्रामस्थांनी सावरखेड येथील चौकात शुटर शहाफत अली खान व त्याचा मुलगा अजगर अली खान आणि दोन सहका-यांचा शाल, श्रीफळ व वाघिणीचा फोटो भेट देऊन जाहीर नागरी सत्कार केला. 
याप्रसंगी शहाफत अली खान म्हणाले, आम्ही इतर ठिकाणीही अशी मोहीम राबविली आहे. मात्र येथील शेतकरी, शेतमजूर यांचे भयग्रस्त जगणे आम्ही जवळून बघितले. ते वाघिणीच्या भितीने घराबाहेर येत नव्हते. गावक-यांचे प्रचंड नुकसान व प्राणहानी बघता वाघिणीचा बंदोबस्त आवश्यक होता. प्रत्यक्षात अवनीवर गोळी झाडताना मी पण गंभीर होतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: avni tigress shot dead, sharp shooter Nawab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.