'अवनी'ला ठार का मारावं लागलं; मुख्य वनसंरक्षक सांगताहेत तेव्हाची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:42 PM2018-11-05T13:42:22+5:302018-11-05T14:36:55+5:30
वन विभागाकडे ‘शूट अॅट साइट’चे आदेशही होते. आमच्यापैकी कुणालाही झालेल्या घटनेमुळे आनंद झालेला नाही. पण कारवाई करणे आवश्यक होते, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रात्रीच्या वेळी अवनी वाघिणीला मारण्याबाबतचे आक्षेप चुकीचे आहेत. दोन महिन्यांपासून आम्ही शोधत असलेली वाघीण बोराटी गावाजवळ दिसली होती. रात्रीच्या वेळी ती गावात गेली असती आणि तिने माणसांवर हल्ला केला असता तर पुन्हा गोंधळ उडाला असता. त्यामुळे आम्हाला तातडीने रात्रीच ही कारवाई करावी लागली. शिवाय, वन विभागाकडे ‘शूट अॅट साइट’चे आदेशही होते. आमच्यापैकी कुणालाही झालेल्या घटनेमुळे आनंद झालेला नाही. पण कारवाई करणे आवश्यक होते, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी रविवारी स्पष्ट केले.
अवनी किंवा टी-१ नावाच्या वाघिणीच्या मृत्यूवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वाघिणीला मारताना नियम पाळला गेला नसल्याचा आरोप आता वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. पांढरकवडा भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वन विभागाच्या पथकाने बोराटीच्या जंगलात गोळ्या घालून ठार केले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिने वन विभागाच्या चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली. मात्र वन विभागाने दिलेल्या या माहितीवर वन्यजीवप्रेमींकडून संशय व्यक्त केला जात आहेत. बेशुद्ध करण्याचे प्रयत्न न करता थेट तिला गोळी घालण्यात आली आणि त्यानंतर केवळ छायाचित्रासाठी या वाघिणीला डार्ट लावण्यात आला, असा संशय वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत. या वाघिणीच्या मोहिमेसाठी हैदराबादहून नेमबाज शहाफत अली खान यांना पाचारण करण्यात आले होते. वाघिणीवर नेम धरण्याची परवानगी शहाफत यांना देण्यात आली होती. प्रत्यक्षात असगर अली खान याने वाघिणीला ठार मारले. याबाबतही वन्यजीवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे.
वन्यजीवप्रेमींकडून घेतलेले आक्षेप वन विभागाने फेटाळून लावले आहेत.
पहिल्यांदा डार्ट मारण्यात आला आणि त्यानंतरच गरज भासल्याने गोळी मारण्यात आली. त्यामुळे नियमभंगाचा प्रश्नच उद्भवत नाही. वाघिणीला ठार मारताना पशुवैद्यकीय अधिकारी नव्हता, असे आक्षेप घेतले गेले आहेत. मात्र, रात्री साडेनऊ वाजता अवनी दिसल्याची बातमी मिळाली. त्यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी बेस कॅम्पवरून निघून गेले होते. वाघिणीला बेशुद्ध करणारे डार्ट त्यांनी वन विभागाच्या प्रशिक्षित कर्मचाºयांकडे सोपविले होते. बातमी मिळाल्याने वन विभागाच्या कर्मचाºयांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. अशावेळी पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या येण्याची वाट बघणे अशक्य होते, अशी माहिती सुनील लिमये यांनी दिली.
अवनी वाघिणीच्या मुद्यावर वन्यजीवप्रेमी जेरिल बानाईत आणि सरिता सुब्रम्हण्यम् यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाघिणीला ठार मारण्यात येऊ नये, असा मुद्दा पहिल्या दोन याचिकेच्या माध्यमातून मांडण्यात आला होता. तिसºया याचिकेत वाघिणीच्या आॅपरेशनमध्ये नियमावलीचे उल्लंघन होत असल्याचे आक्षेप घेण्यात आले होते. मात्र, या दोन्ही याचिका ग्राह्य न धरता सर्वोच्च न्यायालयाने वाघिणीला मारण्याचे आदेश दिले होते.
नियमांचे उल्लंघन झाल्याचा वन्यजीवप्रेमींचा आक्षेप
अवनी वाघिणीच्या मृत्यूची बातमी आली, त्या क्षणापासून वन्यजीवप्रेमींच्या विविध सोशल ग्रुप्समध्ये या प्रकियेबाबत संशय व्यक्त करणे सुरू झाले होते. शुक्रवारी रात्री वाघिणीला ठार मारताना कुणीही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून वाघिणीला ठार मारण्यात आल्याचे आरोप करण्यात येत आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे अत्यंत वाईट पद्धतीने उल्लंघन झाले आहे. संपूर्ण प्रकियाच डावलण्यात आली आहे, अशी शंका असल्याने या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढणारे जेरिल बानाईत यांनी याचिका दाखल केली होती.