अवनीच्या पाठीराख्यांनो, वाघग्रस्त भागात मुक्कामाला या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:25 PM2018-11-05T21:25:56+5:302018-11-05T21:26:32+5:30
अशोक पिंपरे। लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करून त्यांचे संसार उघडे पाडणाऱ्या अवनीच्या शिकारीने देशभर ओरड सुरू ...
अशोक पिंपरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करून त्यांचे संसार उघडे पाडणाऱ्या अवनीच्या शिकारीने देशभर ओरड सुरू असल्याने येथील गावकरी संतप्त झाले आहेत. अवनीचा पुळका असलेल्या पाठीराख्यांनी वाघाची दहशत असलेल्या गावांमध्ये परिवारासह केवळ तीन दिवस मुक्कामी राहून दाखवावे, असे खुले आव्हान संतप्त गावकऱ्यांनी केले आहे.
सुमारे वर्षभर हुलकावणी दिल्यानंतर वन पथकाचा निशाणा बनलेल्या पट्टेदार नरभक्षक वाघीण अवनीसाठी प्रसार माध्यमांवर तिचे पाठीराखे वन खात्याविरोधात गळे काढताना दिसत आहेत. अवनीला ठार मारायला नको होते, असा त्यांचा सूर आहे. मात्र त्यांची ही ओरड ऐकून गावकऱ्यांचा संताप होतो आहे. एकापाठोपाठ १३ जणांची अवनीने शिकार केली तेव्हा हे वन्यजीवप्रेमी नेमके कुठे होते, असा सवाल गावकरी विचारत आहे. मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी वाघाची दहशत असलेल्या पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल असे आव्हान गावकºयांनी दिले आहे.
सुमारे वर्षभरापासून नरभक्षक वाघिणीची पांढरकवडा वनविभागांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्रचंड दहशत आहे. एकापाठोपाठ शिकारी होत असताना वन खात्याने त्याकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. सखी गावात संतप्त नागरिकांनी वन खात्याचे समजून राळेगाव एसडीओंचेच वाहन जाळले होते. तेव्हा कुठे वाघिणीविरुद्धचा संताप पुढे आला. मरणाºयांचा आकडा डझनावर गेल्यानंतर मग वन खाते खडबडून जागे झाले. त्यानंतर तब्बल दोन महिने शोध मोहीम राबविली गेली. त्यावर लाखो रुपयांचा खर्च झाला. वाघिणीच्या या दहशतीमुळे शेतमजुरांनी शेतशिवारात जाणे बंद केले होते. खुद्द वन खात्याने गुराखी व शेतमजुरांना जंगलात जाऊ नये म्हणून आवाहन केले होते. त्यामुळे सुमारे सात हजार हेक्टर शेती वाघग्रस्त भागात पडिक राहिली आहे. शेतीचे सलग दोन हंगाम वाघाच्या दहशतीमुळे बुडाले. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र जीवाच्या भीतीने त्यांनी पुन्हा शेतीत पाय ठेवला नाही. त्यामुळे पुढे पिकाची मशागत, फवारणी, डवरणी करता आली नाही. या भागात शेती हेच गावकऱ्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाघाच्या भीतीने शेतीकडे गावकरी फिरकलेसुद्धा नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे पुढचे वर्ष कसे काढावे, उपजीविका कशी चालवावी असा पेच निर्माण झाला आहे.
अवनीची शिकार झाली असली तरी त्या भागात आणखी एक वाघ व दोन बछडे असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांची दहशत कायमच आहे. अजूनही बेधडकपणे कुणीही शेतकरी-शेतमजूर शेतात जाण्यास तयार नाही. अवनीच्या मृत्यूचा गावात फटाके फोडून जल्लोष होतो यावरून अवनीच्या विरोधात गावकऱ्यांचा किती रोष असेल याची कल्पना येते.
नरभक्षक वाघिणीने मोडला १३ संसारांचा कणा
नरभक्षक वाघिणीने १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार केल्याने त्यांचा संसार, कुटुंब उघड्यावर पडले आहे. कुणाचा पती गेला, कुणाचा एकुलता एक मुलगा गेला तर कुणाचे मातृ-पितृछत्र हरविले. त्यामुळे मुले पोरकी झाली.
वाघिणीने १३ संसारांचा कणाच मोडल्याने आजही या कुटुंबांची वाताहत कायम आहे. शासनाकडून नुकसानभरपाई म्हणून पैसा मिळाला असला तरी कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्याने ही उणीव पैशाने भरुन निघणार काय, असा सवाल या कुटुंबांकडून विचारला जात आहे.
गावकऱ्यांच्या भावना संतप्त
वाघिणीच्या शिकारीनंतर वन्यजीवप्रेमी व काही राजकीय पक्ष, संघटना व नेत्यांकडून तिची पाठराखण केली जात असल्याने गावकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. ज्यांच्या कुटुंबात शिकार झाली त्यांचे आधी हाल पहायला या, अशा शब्दात गावकरी भावना व्यक्त करीत आहे. वेडशीचे सरपंच अंकुश मुनेश्वर, सावरखेडाचे ग्रामस्थ राजू मेश्राम, वरधच्या सरपंच कांचन मेश्राम, सराटीचे दिगांबर तडस, खैरगाव कासार येथील वाघिणीची शिकार ठरलेले मारोती नागोसे यांची पत्नी रंजना, वेडशी येथील मृतक गुलाब मोकाशी यांचा मुलगा केशव, वरध येथील पोलीस पाटील प्रवीण कळसकर आदींनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे मांडल्या. एक वाघ व दोन बछडे असल्याने वाघाची दहशत अद्याप कमी झालेली नाही. अजूनही शेतीत जाण्याची कुणाची हिंमत नाही. गुराखीही जंगलात जाण्यास घाबरत आहे. सायंकाळी ५ नंतर तर सावरखेडा, वरद-वाढोणाबाजार या मार्गावर जणू संचारबंदी लागते अशी स्थिती आहे. गावकरी प्रत्येक दिवस दहशतीत घालवतो आहे. केव्हा वाघ येऊन नरडीचा घोट घेईल याचा नेम नसल्याने नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे, अशा प्रतिक्रिया उपरोक्त मंडळींनी व्यक्त केल्या.