घरकुलाचे धनादेश काढण्यास टाळाटाळ
By admin | Published: July 5, 2014 01:35 AM2014-07-05T01:35:37+5:302014-07-05T01:35:37+5:30
शहरात एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकूल बांधण्यात येत आहे.
यवतमाळ : शहरात एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकूल बांधण्यात येत आहे. मात्र वेळेवर निधीच मिळत नसल्याने अनेकांच्या घराचे काम अर्ध्यावच रखडले आहे. यासाठी नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्षित धोरण कारणीभूत ठरत आहे.
शासनाच्या निधीतून घरकूल मिळाल्याने अनेक गरीब लाभार्थ्यांनी झोपडी मोडून घराचे काम सुरू केले. योजना राबविताना सुरुवातीला नगरपरिषदेतील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांच्याकडून सर्वतोपरी सहकार्याची भाषा केली जात होती. पहिला हप्ताही तितक्याच तत्परतेने देण्यात आला. वेळोवेळी पैसे मिळणार म्हणून अनेकांनी पदरमोड करून घराचे काम सुरू केले. प्रत्यक्षात बांधकामासाठी येणार खर्च आणि मिळणार निधी यात बरीच तफावत आहे. याही स्थितीत घरासाठी सर्व काही म्हणत अनेकांनी कर्जाऊ रक्कम घेऊन काम सुरू ठेवले. शेवटी आर्थिक मर्यादा आल्याने नगरपरिषद कार्यालयात लाभार्थ्यांना चकरा मारण्याची शिवाय पर्याय नाही. येथे मुख्याधिकारी कधीच उपलब्ध होत नाही. इतर कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून जातात. मुख्याधिकाऱ्यांशी दुरध्वनीवर संपर्क केल्यानंतरही ते उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत व्यथा सांगायची कोणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्याधिकाऱ्यांची अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर पकड नसल्याने अनागोंदी कारभार सुरू आहे. येथील प्रभारी कार्यालय अधीक्षक आणि लेखापालाच्या मनमानीमुळे लाभार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. बरेचदा मुख्याधिकाऱ्यांनी धनादेशावर स्वाक्षरी केल्यानंतरही तो जमा करण्यासाठी संबंधितांकडून अकारण वेळ लावला जातो. येत्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी )