कळंब महसूल विभागाची फेरफार घेण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:45 AM2021-03-09T04:45:38+5:302021-03-09T04:45:38+5:30
कळंब : खरेदी झालेल्या जमिनीचा नऊ महिने लोटूनही फेरफार घेण्यात आला नाही. मंडळ अधिकारी व तलाठी यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ ...
कळंब : खरेदी झालेल्या जमिनीचा नऊ महिने लोटूनही फेरफार घेण्यात आला नाही. मंडळ अधिकारी व तलाठी यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे वृद्ध शेतकरी महिलेने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
वडगाव (देशपांडे) येथील पुष्पा दिनकर बोरगावकर यांच्या आईने तीन हेक्टर ७८ आर इतक्या क्षेत्रफळाची जमीन पुष्पा व त्यांचा मुलगा सोपान दिनकर बोरगावकर यांना नोंदणीकृत खरेदीखताद्वारे नावे केली. या जमिनीचा फेरफार व्हावा यासाठी २ जून २०२० रोजी संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, संबंधित तलाठी यांनी खरेदी दस्त क्रमांक ३२१नुसार सोपान बोरगावकर यांच्या हक्कात फेरफार घेण्याची कार्यवाही पूर्ण केली. परंतु पुष्पा बोरगावकर म्हणून माझे खरेदी दस्त क्रमांक ३२२ वरून अजूनपर्यंतही फेरफार घेण्यात आला नाही. यासंबंधी वारंवार मंडळ अधिकारी रवींद्र शिंदे व तलाठी कांचन टांगले यांच्याशी संपर्क करूनही फेरफार घेतलेला नाही.
ज्याप्रमाणे माझ्या मुलाच्या हक्कात फेरफार घेऊन मंजूर करण्यात आला, त्याप्रमाणे माझेही हक्कात फेरफार घेऊन मंजूर करण्यात यावा. सोबतच विनाकरण त्रास देण्याऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी वृद्ध शेतकरी महिला पुष्पा बोरगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
फेरफारची प्रक्रिया सुरू : मंडळ अधिकारी
संबंधित फेरफारवर आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्यामुळे प्रक्रिया पार पाडण्यात वेळ लागत आहे. नियमानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मंडळ अधिकारी रवींद्र शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.