‘एसटी’ वाहकांच्या टपालभत्त्यास यवतमाळ आगारात टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:00 AM2019-08-25T06:00:00+5:302019-08-25T06:00:14+5:30

टपाल वाहतुकीची नोंद आगार पातळीवर घेतली जाते. टपालथैलीची ने-आण झाली असल्यास त्याची नोंद टी-२ए या रजिस्टरवर संबंधित लिपिकाकडून घेतली जाते. पगार देयक तयार करताना वाहकाला नोंदीनुसार टपालभत्ता दिला जातो. परंतु टपालभत्त्याची नोंद घेतली जात असली तरी वाहकांना त्यांचा या कामापोटीचा मेहनताना दरमहा मिळत नाही.

Avoid posting of 'ST' carriers at Yavatmal Agar | ‘एसटी’ वाहकांच्या टपालभत्त्यास यवतमाळ आगारात टाळाटाळ

‘एसटी’ वाहकांच्या टपालभत्त्यास यवतमाळ आगारात टाळाटाळ

Next
ठळक मुद्देपोस्टाकडून मात्र वसूल । कर्मचाऱ्यांच्या कामातील कुचराईने होत आहे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील वाहकांना टपालभत्त्यापासून वंचित राहावे लागत आहे. कर्मचाऱ्यांची कुचराई आणि आगारातील वरिष्ठांचा दुर्लक्षितपणा यामुळे वाहकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. महामंडळ डाक विभागाकडून टपालाची रक्कम वसूल करत असताना वाहकांना देण्यात अडचण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एसटीच्या काही टपालफेऱ्या आहेत. मार्गात असलेल्या गावांमध्ये टपाल टाकण्याची संपूर्ण जबाबदारी वाहकांवर आहे. यासाठी त्यांना दरमहा टपालभत्ता निश्चित करण्यात आला आहे. टपाल वाहतुकीची नोंद आगार पातळीवर घेतली जाते. टपालथैलीची ने-आण झाली असल्यास त्याची नोंद टी-२ए या रजिस्टरवर संबंधित लिपिकाकडून घेतली जाते. पगार देयक तयार करताना वाहकाला नोंदीनुसार टपालभत्ता दिला जातो. परंतु टपालभत्त्याची नोंद घेतली जात असली तरी वाहकांना त्यांचा या कामापोटीचा मेहनताना दरमहा मिळत नाही. टपाल कोठून घ्यायची आणि कुठे टाकायची ही सर्व जबाबदारी वाहकांवर आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांना भत्त्याची रक्कम देण्यात बेजबाबदारपणा होत असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रामुख्याने यवतमाळ आगार पातळीवर हा प्रकार सातत्याने घडत आहे. संबंधित लिपिक, वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापकांची जबाबदारी असताना या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाहकांच्या वेतनाचा आलेख पाहता आजच्या महागाईच्या काळात बराच खाली आलेला आहे. दैनंदिन गरजा भागविताना त्यांना मोठी कसरत करावी लागते. पाल्याचे शिक्षण, आरोग्य विषयक बाबी पार पाडताना होणाऱ्या खर्चामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहात आहे. टपालभत्त्यासारखा अतिरिक्त पैसा जवळ आल्यास काहीना काही प्रमाणात दिलासा मिळतो. मात्र यातही सातत्य नाही. वरिष्ठांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

नुकसान भरपाई होते वसूल
टपालथैली संबंधित गावात पोहोचेपर्यंत वाहकांना त्यावर लक्ष ठेवावे लागते. ही थैली हाताळण्यात निष्काळजीपणा झाल्यास वाहकाविरूद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाते. नुकसान भरपाईलाही सामोरे जावे लागते. शिवाय टपालथैलीतील साहित्य खराब होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते.

Web Title: Avoid posting of 'ST' carriers at Yavatmal Agar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.