‘थर्टी फर्स्ट’चा गोंधळ टाळून शेतीविषयी जागविले भान

By admin | Published: January 2, 2016 08:37 AM2016-01-02T08:37:02+5:302016-01-02T08:37:02+5:30

जिल्ह्यात शेतीचे प्रश्न कितीही गहण बनले, शेतकऱ्यांचे जगणे कितीही मुश्कील बनले, तरीही नववर्षाच्या नावावर

Avoiding the confusion of 'Thirty First' and awareness about agriculture | ‘थर्टी फर्स्ट’चा गोंधळ टाळून शेतीविषयी जागविले भान

‘थर्टी फर्स्ट’चा गोंधळ टाळून शेतीविषयी जागविले भान

Next

यवतमाळ : जिल्ह्यात शेतीचे प्रश्न कितीही गहण बनले, शेतकऱ्यांचे जगणे कितीही मुश्कील बनले, तरीही नववर्षाच्या नावावर ‘थर्टी फर्स्ट’ला पैशाची उधळपट्टी दरवर्षीच होत आली. यंदा मात्र गरिबांच्या जखमांवर मीठ चोळणारा हा प्रकार टाळण्यासाठी लोकजागृती मंचने अनोखा उपक्रम शहरात राबविला. ज्यावेळी ‘थर्टी फर्स्ट’च्या बहाण्याने नागरिक दारूमध्ये धुंद होतात, नेमक्या त्याचवेळी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा कार्यक्रम अनेकांच्या संवेदना जागवून गेला.
यावर्षी जिल्ह्यात प्रचंड दुष्काळाची स्थिती आहे. नापिकीमुळे तब्बल ३८४ शेतकऱ्यांनी वर्षभरात मृत्यू कवटाळला. कित्येकांनी तर केवळ सणाच्या दिवशी आपल्या मुलांना नवे कपडे घेऊन देऊ शकत नाही, या आगतिकतेपायी आत्महत्या केली. नेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने थेट पालकमंत्र्यांनाच आपल्या जीवनाची करुण कहानी सांगणारी चिठ्ठी लिहून जीव दिला. उमरखेड तालुक्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने झाडाला गळफास लावला. ऐनवेळी त्याची अर्धांगिनी पोहोचल्याने त्या शेतकऱ्याला मरणापासून परावृत्त करता आले. पण शेतकऱ्यांचे जीव गरिबीपायी जात असताना जिल्ह्यातील श्रीमंत आणि पांढरपेशा वर्गाने शेतीच्या समस्येपासून फारकत घेता कामा नये, अशी भूमिका घेवूनच लोकजागृती मंचने ऐन ‘थर्टी फर्स्ट’च्या औचित्यावरच शेतकऱ्यांचे दु:ख जगजाहीर करण्याचा कार्यक्रम आखला.
येथील तिरंगा चौकात ३१ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता हा सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला भूदान चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, डॉ.रमाकांत कोलते, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.महेंद्र ठाकरे, नरेश उन्हाळे गुरुजी, डॉ.आलोक गुप्ता, न.मा. जोशी, नागेश गोरख, विजया धोटे, साहेबराव खडसे, डॉ.छाया महाले, वर्षा निकम, शब्बीर बेग, अन्सारी चाचा, साहेबराव पवार उपस्थित होते. लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार आणि घाटंजी पंचायत समितीचे सभापती शैलेश इंगोले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी झाला. सूत्रसंचालन हेमंतकुमार कांबळे यांनी केले. विजय दुरुतकर व त्यांच्या संचाने शेतकऱ्यांची उमेद जागविणारी गीते सादर केली. या मैफलीचे सूत्रसंचालन रूपेश कावलकर यांनी केले. शहरात ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषासाठी धावपळ सुरू असतानाच या कार्यक्रमाने अनेकांची बहकलेली पावले तिरंगा चौकात खिळवून ठेवली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे घोषित झाले आणि जिल्ह्यातील दुष्काळावरही शिक्कामोर्तब झाले. (स्थानिक प्रतिनिधी)

दारू टाळण्यासाठी दुधाचे वाटप
४‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने अनेक तरुण दारूच्या आहारी जातात. पैशाची ही उधळपट्टी गरिबांच्या जखमा ताज्या करीत असते. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकजागृती मंचने कार्यक्रमस्थळी दुधाचे वाटप केले. केसरयुक्त गरम दुधाच्या कढया कार्यक्रमाच्या ठिकाणी लावून तरुणांना मोफत दूध वाटप करण्यात आले. दारू ढोसण्याऐवजी दूध प्राशन करून नवी पिढी बलदंड व्हावी, असा संदेश यातून देण्यात आला.

Web Title: Avoiding the confusion of 'Thirty First' and awareness about agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.