आॅनलाईन खरेदी टाळून मेनलाईनमध्येच गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 09:30 PM2018-11-10T21:30:24+5:302018-11-10T21:31:14+5:30
आॅनलाईन खरेदीच्या वाढत्या प्रस्थाने स्थानिक दुकानदारांना मोठा फटका बसतो आहे. आॅनलाईन विरोधात व्यापाऱ्यांनी बंड पुकारलेले असतानाच काही ठिकाणी बोगस वस्तूंचा आॅनलाईन पुरवठा झाल्याचा प्रकार उघड झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आॅनलाईन खरेदीच्या वाढत्या प्रस्थाने स्थानिक दुकानदारांना मोठा फटका बसतो आहे. आॅनलाईन विरोधात व्यापाऱ्यांनी बंड पुकारलेले असतानाच काही ठिकाणी बोगस वस्तूंचा आॅनलाईन पुरवठा झाल्याचा प्रकार उघड झाला. अशा डॅमेज निघालेल्या वस्तूंची गॅरंटी घेण्यास आॅनलाईन कंपन्यांनी नकार दिला. याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकाला बसला. यामुळे दिवाळीच्या शेवटच्या दिवसात ग्राहकांनी प्रत्यक्ष दुकानात जाऊनच खरेदी केली. यामुळे शनिवारी बाजारपेठ हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसले.
गेल्या तीन-चार वर्षात आॅनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, महागड्या वस्तू आॅनलाईन बोलविल्या जात होत्या. यामध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, शौचालयाच्या सिट्स यासह अनेक वस्तूंचा समावेश आहे. आॅनलाईन नोंदणी केलेल्या वस्तू घरपोच येताना त्यामध्ये बदल झालेल्या वस्तू ग्राहकांना मिळत होत्या. पोहचलेल्या वस्तू डॅमेज असल्या तरी उघडताच त्याची गॅरंटी संपत होती. यामुळे या वस्तू वापस घेतल्या गेल्या नाही. अनेक भागामध्ये असे प्रकार उघडकीस आले. यामुळे ग्राहकांनी आॅनलाईन वस्तू बोलावणे कमी केले आहे.
स्थानिक बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. दिवाळीत होलसेल विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री करण्यात आली. कर्मचाऱ्यांना मिळालेला बोनस आणि वेतनाने ही गर्दी अधिक वाढली. यातून बाजारात दीपोत्सवाच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
शेतकरी खरेदीपासून दूरच
शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसल्याने दिवाळीच्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कमी राहिला. दुचाकी वाहनांचे बुकिंगही प्रभावित झाले. कापड दुकानातही शेतकरीवर्ग पाहायला मिळाला नाही. यामुळे नऊवारी साडी, पांढरे टेरिकॉटचे कापड, टॉवेल आणि लुगडे, धोतरांची विक्री थंडावली.
आॅनलाईन खरेदीपासून ग्राहक दूर राहिले. त्यांनी स्थानिकांना पहिली पसंती दिली. शेवटचे तीन दिवस बाजार तेज राहिला.
- अरूणभाई पोबारू
अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स, यवतमाळ