महागाव ठाण्यात रात्री फिर्याद घेण्यास टाळाटाळ
By admin | Published: February 27, 2017 12:58 AM2017-02-27T00:58:18+5:302017-02-27T00:58:18+5:30
येथील पोलीस ठाण्यात रात्रीला कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण सांगून फिर्याद नोंदवून घेतली जात नाही.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बीट टार्गेटमुळे जमादार झाले हैराण
संजय भगत महागाव
येथील पोलीस ठाण्यात रात्रीला कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण सांगून फिर्याद नोंदवून घेतली जात नाही. त्यामुळे या घटनेची तीव्रता आपसूकच कमी होत आहे. अनेकदा आॅनलाईन एफआयआर नोंदणी करताना सर्व्हर डाऊनचे कारण पुढे करून फिर्यादीला दोन-दोन तास ठाण्यात बसवून ठेवले जात असल्याचे येथे दिसून येते.
हिवरा, सवना, फुलसावंगी, गुंज आणि महागाव टाऊन हे पाचही बिट कमाईचे म्हणून ओळखले जातात. कधी काळी हे बिट मिळावे म्हणून बोली लावण्यात येत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यात रंगत असायची. आता वरली मटका, जुगार आणि हातभट्टीच्या दारूचे मोठ्या प्रमाणात गाळप केले जाते. मुडाणा, फुलसावंगी, सवना अन्य ठिकाणी दारूबंदी विभागाने हातभट्टीवर कारवाई केली. परंतु अद्यापही त्या विक्रेत्यांचा कायम बंदोबस्त झाला नाही. तालुक्यात दररोज ४० हजार लिटर दारूचे गाळप केले जाते. या गुत्त्यातून मिळणारे उत्पन्न मोठे असल्याची चर्चा होत असते. या कारणावरून कित्येक वेळा टार्गेट पूर्ण न करणाऱ्यांकडून बीट काढून घेतले जातात. सुरुवातीला अशा दारू विक्रेत्यांवर धाड मारून कारवाईचे नाटक पोलिसांनी केले. परंतु त्यांना आता खुलेआम मुभाच दिल्याचे दिसत आहे.
पोखरी, फुलसावंगी येथे खुलेआम मटका-जुगाराचे अड्डे सुरू आहे. रात्रीची गस्त बंद असून कर्मचारी आपआपल्या गावी निघून जातात. बंदोबस्ताच्या फिक्स पॉर्इंटवर कुणीही आढळून येत नाही. एवढेच काय तर शासनाचे कोषागारही सुरक्षित नाही. ग्रामीण भागातील नागरिक तर सोडाच शहरातील नागरिक रोज रात्रीला चोराच्या भीतीने रात्र जागून काढतात. कनजखेड चे किसन पवार २० फेब्रुवारी मुलगा हरविल्याची फिर्याद देण्यासाठी गेला असता त्याला पैशाची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु अधिकाऱ्यांचा आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांवर वचक दिसत नाही.