आरोग्य, झेडपीतील १९ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 11:30 AM2022-07-18T11:30:56+5:302022-07-18T11:31:55+5:30
जिल्हा परिषदेतील १३ हजार आणि आरोग्य विभागातील सहा हजार, अशा १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सतत लांबणीवर पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेतील १३ हजार आणि आरोग्य विभागातील सहा हजार, अशा १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सतत लांबणीवर पडत आहे. यामुळे या पदासाठी अर्ज भरून ठेवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. सुमारे आठ लाख विद्यार्थ्यांनी या पदाकरिता अर्ज केलेले आहे. त्यांना भरती प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारने ही भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.
आरोग्य विभागामध्ये सहा हजार पदांसाठी २०२१ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. दोन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. या पदाकरिता नव्याने प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु भरती प्रक्रियेला सुरुवात केव्हा होणार हा उमेदवारांचा प्रश्न आहे.
जिल्हा परिषदेमध्ये विविध संवर्गातील १३ हजार पदांकरिता अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. सन २०१९ मध्येच यासाठीचे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले. परंतु या परीक्षेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना ना कॉल आले, ना परीक्षा घेण्यात आली. तीन वर्षांचा कालावधी लोटूनही भरती होत नसल्याने उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नेमके घोडे कुठे अडले हा त्यांचा प्रश्न आहे. उमेदवारांनी आंदोलने केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.