गणेशोत्सवातून कोविड लसीकरणाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:50 AM2021-09-17T04:50:05+5:302021-09-17T04:50:05+5:30
मुकेश इंगोले दारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले. त्याउपरही सर्वत्र गणेशोत्सवाची ...
मुकेश इंगोले
दारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले. त्याउपरही सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. परंतु या धामधुमीतही येथील एका गणेश मंडळाने नियमांचे पालन करण्यासोबतच कोविड लसीकरणाची जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
ओम गणेश मंडळाने स्थापना केलेले कोविड लसीवर विराजमान इवलेसे बाप्पा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर इतर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. उत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा या मंडळाने सुरू केली. सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
येथील अंबिकानगरातील हे मंडळ गणेशोत्सवात दरवर्षी काही तरी वेगळे सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबविते. या वर्षी कोविड लसीवर विराजमान गणपती बाप्पा कोरोनाबाबत जनजागृती करतानाचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. मूर्तिकार महेश दंडे यांनी केवळ नऊ इंच उंचीची सुबक गणेशमूर्ती साकारली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या आजारावर अद्याप औषध निघाले नाही. त्यामुळे लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. लस घेण्यासाठी सर्वच स्तरांवरून आवाहन केले जात आहे. तरीसुद्धा यासाठी आणखी जनजागृतीची गरज लक्षात घेता या मंडळाने तसा देखावा तयार केला. त्याचबरोबर सर्वात कमी उंचीची मूर्ती स्थापन व कोरोनाचे सर्व नियम पाळून उत्सव साजरा केला जात आहे.
नायब तहसीलदार सुनील सरागे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर व नागरिकांसाठी लसीकरण शिबिर, दिव्यांग चित्रकार राजू राठोड याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मंडळाच्या सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. ॲड. नितीन जवके, ॲड. सचिन गोरले, सुनील आरेकर यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे अध्यक्ष जीवन काळे, उपाध्यक्ष संदीप शिले, सचिव स्वप्निल राठोड, कोषाध्यक्ष प्रवीण राऊत, विलास शिले, महेश दंडे, निखिल मडसे, किशोर राऊत, ऋषिकेश गोटे, गौरव डोमाळे, अमोल राठोड आदींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
बाॅक्स
विविध उपक्रम राबविले
ओम गणेश मंडळाने सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून ओळख निर्माण केली. यापूर्वी गणेशोत्सव तसेच मिरवणुकीच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या, वृक्षारोपण, स्त्री भ्रूणहत्या, बेटी बचाओ, बेटी पढाव, वृद्धाश्रम आदी समस्यांवर प्रकाश टाकला. त्यामुळे मंडळाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.