उटी येथे ई क्लास जमिनीवरील सागवान वृक्षांवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:41 AM2021-03-19T04:41:38+5:302021-03-19T04:41:38+5:30
संबंधित ई क्लास जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण करून जमीन वापरात घेतली आहे. हा परिसर नदीलगत असल्याने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची ...
संबंधित ई क्लास जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण करून जमीन वापरात घेतली आहे.
हा परिसर नदीलगत असल्याने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे. त्यामुळे या क्षेत्रातील जंगलात राष्ट्रीय पक्षी मोर, लांडोरांचा वावर आहे. त्यामुळे या राष्ट्रीय पक्षाची शिकार होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यांची देखरेख करणारे कुणीच नाही. त्यामुळे सागवान तस्करांनी बेधडक मोहीम राबविली आहे.
सरकारच्या ई क्लास जमिनीलगत असलेल्यांनी अतिक्रमण केल्याची माहिती उटी येथील सामाजिक कार्यकर्ते आत्माराम गावंडे यांनी तहसील प्रशासनाला दिली. त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री, विभागीय आयुक्त यांनाही निवेदन पाठवून या विषयाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.
या ई क्लास जमिनीलगत उटी शेत शिवार आहे. सर्वे नंबर ६३, ६४, १११, ११२, ११३, १२६ हे सर्वे नंबर असून लागून असलेले शेतकरी सरकारी जमिनीमध्ये असलेल्या सागवान वृक्षांवर आपला मालकी हक्क दाखवीत आहे. ते वृक्षांची सर्रास विक्री करत असल्याचे गावंडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. वनाधिकाऱ्यांनी या विषयाकडे लक्ष घालण्याची गरज असताना इ क्लास ही महसूलची जमीन असल्याने चक्क वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार आहे. महसूल प्रशासनाने सदरच्या जमिनीतील सागवान झाडांची मोजणी करून घ्यावी, प्रत्यक्ष पाहणी करून सर्वे नंबर ४६ इ क्लास सरकारच्या ७/१२ वर उतरवून घ्यावी, इ क्लासवर झालेले अतिक्रमण हटवून आपला ताबा घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.