आयुर्वेदच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
By Admin | Published: September 3, 2016 12:38 AM2016-09-03T00:38:25+5:302016-09-03T00:38:25+5:30
येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी गेल्या महिनाभरापासून आंदोलनात्मक पवित्रा घेत संपावर आहे
व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : सहा महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचारी संतप्त
पुसद : येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी गेल्या महिनाभरापासून आंदोलनात्मक पवित्रा घेत संपावर आहे. उपोषणही करण्यात आले. मात्र अद्यापही त्यांच्या या आंदोलनाची दखल व्यवस्थापनाने घेतली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
आयुर्वेद महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली. मात्र व्यवस्थापनाचा वाटा जमा केला नाही. यासोबत इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी महिनाभरापूर्वी आंदोलनाला प्रारंभ केला. यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर या कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. परंतु प्राचार्य डॉ. श्याम हुमणे व अध्यक्ष राधेश्याम जांगीड यांनी कोणतीही दखल घेतली नाही. कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनाही पुसद भेटीत निवेदन देण्यात आले. आता या प्रकरणी काय निर्णय लागतो आणि महाविद्यालय सुरू होऊन कर्मचाऱ्यांना कधी वेतन मिळते याकडे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)