आयुष्यमान उपकेंद्र नामधारी; खासगीत घ्यावे लागतात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 05:33 PM2024-11-13T17:33:06+5:302024-11-13T17:49:49+5:30
Yavatmal : तळणी उपकेंद्राचा बेताल कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
कुन्हा (तळणी) : नागरिकांना गावापासून जवळच आरोग्यविषयक उपचार मिळावे यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, काही ठिकाणचे उपकेंद्र नामधारी ठरले आहे. यातीलच एक तळणी (कुन्हा) येथील उपकेंद्र आहे. हे उपकेंद्र कर्मचाऱ्यांच्या सोईनुसार चालते. अनेकदा नागरिकांना आरोग्य विषयक सेवा मिळत नाही. समुदाय आरोग्य अधिकारी (डॉक्टर) सुटीवर असल्यास औषधोपचार परिचारिकेकडून केला जातो.
भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तळणी आरोग्य उपकेंद्र आहे. या केंद्राच्या कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याठिकाणी नियुक्त असलेले डॉक्टर, कर्मचारी अपवादानेही मुख्यालयी राहत नाही. ही बाब नित्याची झालेली आहे. त्यांची मनमानी सुरू आहे. उपकेंद्र केव्हा उघडायचे, केव्हा बंद करायचे, उघडायचे की नाही, हे सर्व तेच ठरवतात. यासाठी कारणेही ठरलेली आहेत.
सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:२५ वाजता आरोग्य उपकेंद्र बंद होते. रुग्ण तपासणी सुरू होण्याची वेळ सकाळी ८:३० वाजताची आहे. याविषयी आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता सीएचओ (समुदाय आरोग्य अधिकारी), एमपीडब्ल्यू (आरोग्य कर्मचारी) सुटीवर असल्याचे सांगण्यात आले. एका आरोग्य सेविकेची रात्रपाळीत कामगिरी होती, तर दुसरी आरोग्य सेविका गावात व्हिजिट देत असल्याची माहिती देण्यात आली. आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे. परंतु, याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना खासगी डॉक्टरकडे मदत घ्यावी लागते.
तळणी आरोग्य उपकेंद्राची निवासस्थाने अडगळीत
तळणी येथील आरोग्य उपकेंद्राचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आलेली आहेत. मात्र, याचा उपयोग होत नसल्याने ती अडगळीत पडली आहे. या कामांवर लाखो रुपये खर्च करण्यात आलेला आहे. तो व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येते.
"डॉक्टर रजेवर असल्यास इतर कर्मचारी आयुष्यमान आरोग्य मंदिराचा कारभार सांभाळतात. सोमवारी सीएचओ, आरोग्यसेवक सुटीवर होते. आरोग्यसेविका व्हिजिटला गेल्या होत्या."
- ऋतुश्री राऊत, सीएचओ, तळणी
"आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावरून आरोग्य विभागाला पत्र देण्यात आहे आहे. विभागाने पत्राकडे दुर्लक्ष केले आहे."
- श्रीराम मेश्राम, सरपंच, तळणी (कुहा)