देश समाजवादी होण्यातच बाबासाहेबांना श्रद्धांजली

By admin | Published: April 10, 2016 02:54 AM2016-04-10T02:54:45+5:302016-04-10T02:54:45+5:30

ज्या देशातील धर्मग्रंथांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना पापयोनी म्हटले, ज्या देशातील ७८ टक्के लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले,

Babasaheb's tribute to the country as a socialist | देश समाजवादी होण्यातच बाबासाहेबांना श्रद्धांजली

देश समाजवादी होण्यातच बाबासाहेबांना श्रद्धांजली

Next

रावसाहेब कसबे : आंबेडकरी चळवळ, राजकारण, राष्ट्रवाद विषयांवर ‘लोकमत’शी दिलखुलास बातचित
काशीनाथ लाहोरे यवतमाळ
ज्या देशातील धर्मग्रंथांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना पापयोनी म्हटले, ज्या देशातील ७८ टक्के लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले, ज्या देशातील स्त्रियांना पतीसोबत सती जाण्यास प्रोत्साहन दिले, असा भारत देश कधीही सहिष्णू नव्हता. स्त्री-पुरुषांमध्ये आणि जाती-जातीत भेद निर्माण करणारी मनुस्मृतीच राष्ट्र निर्माण होवू न देण्यात सर्वात मोठा अडथळा होती. स्त्रीने एखादा पुरुष बघितला की ती त्याला वश करून नवऱ्याशी द्रोह करणारच असा शाप मनुस्मृतीने स्त्रियांना दिला आहे. एकेकाळी अस्तित्वात असलेली ही संस्कृती पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा डाव येथे खेळला जात आहे, असे मत प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ‘क्षण एक गौरवाचा’ या समता पर्वातील कार्यक्रमासाठी यवतमाळ येथे आले असताना ‘लोकमत’ला त्यांनी विशेष मुलाखत दिली. ते म्हणाले, रोहित वेमुला किंवा कन्हैया ही आत्मभान आलेली तरुणाई आहे. पुरोगामी तरुण आणि आंबेडकरी विचार यांच्या समन्वयातूनच जाती अंताचा विचार पक्का होवू शकतो. भारतात स्वातंत्र्यानंतर राष्ट्रवादाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, येथील जातीयवादी संघटनांचा त्याला विरोध सुरू असतो. भारताला राष्ट्र होवू न देण्यात जातीयवादी आणि धर्मवादी संघटना अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे, जे या देशाला राष्ट्र होवू देण्यास विरोध करतात तेच राष्ट्रवादाचा पुरस्कार करताना आढळतात. जे राष्ट्रवादाच्या निर्मितीत सामील आहेत त्यांनाच राष्ट्रद्रोही ठरविले जात आहे. जगात नेहमीच विवेकवादाचा विजय होवून अंधश्रद्धांचा पराभव झाला आहे. महात्मा फुलेंचा राष्ट्रवाद हा बहुजन समाजवादी राष्ट्रवाद होता, तर रामदासांचा राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवाद होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संदेश देताना रावसाहेब म्हणाले, भारत हा लोकशाही समाजवादी देश बनला पाहिजे, असे बाबासाहेबांचे भारत निर्माणाबाबतचे स्वप्न होते. ते वास्तवात आणण्याचा प्रयत्न करणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे.

आंबेडकरी चळवळ सर्वच क्षेत्रात झिरपलेली
आंबेडकरी चळवळ समजून घेण्यासाठी राजकीय पक्षांवरून मूल्यमापन करून चालणार नाही. ही चळवळ सर्व क्षेत्रात झिरपलेली आहे. आंबेडकरांच्या नावाने चालणारे पक्ष आणि चळवळी धंदेवाईक झाल्या आहेत. आंबेडकरी चळवळ ही नेहमीच परावलंबी राहिलेली आहे. नेत्यांनी तडजोडी करून समाजाची दिशाभूल केली. आंबेडकरी चळवळीला नीट दिशा देण्यात नेते मंडळी असफल ठरली आहे. यापुढे कुठल्याही जातीला पार्टी करून राजकारण करता येणार नाही. आंबेडकरी विचारांशी समविचारी असणाऱ्या पक्षांशी युती करूनच राजकीय पक्षांची स्थापना करावी लागेल आणि हे जातीचा अंत झाल्याशिवाय शक्य होणार नाही.

Web Title: Babasaheb's tribute to the country as a socialist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.