मागासवर्गीय प्रौढांनी ओळखले शिक्षणाचे मोल, नव भारत साक्षरता; परीक्षेत ओबीसी, खुल्या गटापेक्षा एसटी, एससीचा हिरीरीने सहभाग
By अविनाश साबापुरे | Published: March 21, 2024 04:09 PM2024-03-21T16:09:44+5:302024-03-21T16:10:22+5:30
खुला गट आणि ओबीसी प्रवर्गापेक्षा अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील प्रौढांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. राज्यात परीक्षेला बसलेल्या साडेचार लाख प्रौढांपैकी तब्बल दोन लाख परीक्षार्थी हे एससी आणि एसटी प्रवर्गाचे होते.
यवतमाळ : उतारवयात शिकून आता काय फायदा? असा उदासीन सवाल अनेक जण विचारत असताना मागासवर्गीय प्रौढांनी मात्र शिक्षणाचे खरे मोल ओळखून नव भारत साक्षरता परीक्षेत जोरदार बॅटिंग केली. १७ मार्च रोजी राज्यात प्रौढ निरक्षरांची पहिली परीक्षा पार पडली. त्यात खुला गट आणि ओबीसी प्रवर्गापेक्षा अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील प्रौढांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. राज्यात परीक्षेला बसलेल्या साडेचार लाख प्रौढांपैकी तब्बल दोन लाख परीक्षार्थी हे एससी आणि एसटी प्रवर्गाचे होते.
देश २०२७ पर्यंत १०० टक्के साक्षर करण्याच्या उद्देशाने नव भारत साक्षरता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील एकंदर एक कोटी ६३ लाख प्रौढ निरक्षरांपैकी १२ लाख ४० प्रौढांना यंदा साक्षर करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. प्रत्यक्षात या अभियानात मार्चपर्यंत केवळ सहा लाख २१ हजार ४६२ प्रौढांचीच नोंदणी झाली. तर १७ मार्च रोजी झालेल्या परीक्षेला केवळ चार लाख ५६ हजार ७४८ प्रौढांनीच हजेरी लावली.
योजना शिक्षण संचालनालयाने प्रवर्गनिहाय निरक्षरांचे लक्ष्य सर्व जिल्ह्यांना निर्धारित करून दिलेले होते. त्यात ओबीसी व खुल्या प्रवर्गातील सर्वाधिक म्हणजे सात लाख ६६ हजार ८१७ निरक्षर होते. त्यापैकी केवळ दोन लाख ३६ हजार ५४५ निरक्षर परीक्षेला आले. तीच परिस्थिती अल्पसंख्यक प्रवर्गाची आहे. अल्पसंख्यक प्रवर्गातील दोन लाख १३ हजार ३१ निरक्षरांचे लक्ष्य होते. त्यापैकी केवळ २४ हजार २६३ जणांनीच परीक्षा दिली. तर अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील निरक्षरांचे लक्ष्य दोन लाख ६० हजार १५२ इतके असताना तब्बल एक लाख ९५ हजार ९४० प्रौढांनी परीक्षेसाठी धाव घेतली. नोंदणीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण इतर प्रवर्गापेक्षा मागासवर्गीयांचे अधिक आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिक्षण हेच आपल्या जगण्याचा आधार ठरू शकते, यावर मागासवर्गीयांचा प्रगाढ विश्वास असल्याचे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. तर एकूण परीक्षा देणाऱ्यांमध्ये २२८३ प्रौढ दिव्यांगांचाही समावेश होता. मात्र नोंदणी झालेल्या ११६ तृतीयपंथीयांपैकी केवळ १५ जणांनाच परीक्षा केंद्रात आणण्यात शिक्षकांना यश मिळाले.
साक्षरतेसाठी कोण किती उत्सुक?
प्रवर्ग : लक्ष्य : परीक्षा दिली
जनरल/ओबीसी : ७,६६,८१७ : २,३६,५४५
एससी : १,२६,६०४ : ६६,०१५
एसटी : १,३३,५४८ : १,२९,९२५
अल्पसंख्यक : २,१३,०३१ : २४,२६३
एकूण : १२,४०,००० : ४,५६,७४८
साक्षरता परीक्षेत आजोबापेक्षा आजीच भारी
- महिला
लक्ष्य : ७,४४,३१७
नोंदणी : ४,२०,८३४
परीक्षा दिली : ३,१७,४९२
- पुरुष
लक्ष्य : ४,९५,६८३
नोंदणी : १,९५,९७३
परीक्षा दिली : १,३९,२४१