राळेगाव येथे बहुजन क्रांती मोर्चा
By admin | Published: May 4, 2017 12:23 AM2017-05-04T00:23:07+5:302017-05-04T00:23:07+5:30
विविध मागण्यांना घेवून बुधवारी राळेगाव येथे बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.
राळेगाव : विविध मागण्यांना घेवून बुधवारी राळेगाव येथे बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांना निवेदन सादर केले. सुरुवातीला जुना आठवडी बाजार चौकात सभा घेण्यात आली. बहुजन, शेतकरी आदींच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
विजयराज सेगेकर यांच्या नेतृत्त्वात क्रांती चौक, मेन रोड मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. भूदानातील शेतकऱ्यांना व अतिक्रमणधारकांना शेतीचे पट्टे त्यांच्या नावे करण्यात यावे, इव्हीएमद्वारे मुक्त, नि:पक्ष आणि पारदर्शी निवडणुका व्हाव्या यासाठी बॅलेट पेपरचा वापर करावा, ओबीसीची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, मुस्लीम समाजाला सच्चर समितीच्या शिफारशी लागू करून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, राळेगावातील पाण्याचा प्रश्न निकाली काढावा आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या.
यावेळी इव्हीएमची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. निवेदन देताना विजयराज सेगेकर, शंकर उईके, जानराव पेंदाम, अंबादास मेश्राम, नारायण सोडे, संतोष कोरांगे, विठ्ठलराव कुडसंगे, विठाबाई उईके, नामदेव मेश्राम, गणेश कुडसंगे, उषा उईके आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)