बळीराजा चिंतेच्या सावटात
By Admin | Published: November 1, 2014 11:16 PM2014-11-01T23:16:20+5:302014-11-01T23:16:20+5:30
कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या आहे़ याहीवर्षी बळीराजा त्याच स्थितीतून जात आहे़ अपुऱ्या पावसाने खरीपात दगा दिला़ परतीचा पाऊस कोसळेल,
मारेगाव : कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या आहे़ याहीवर्षी बळीराजा त्याच स्थितीतून जात आहे़ अपुऱ्या पावसाने खरीपात दगा दिला़ परतीचा पाऊस कोसळेल, ही आशाही फोल ठरल्याने रबी गेल्यातच जमा आहे़ त्यामुळे आता कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा आणि जनावरांच्या चाऱ्याचे काय करायचे, या चिंतेने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे़
हे वर्ष शेतकऱ्यांसाठी कंबरडे मोडणारे ठरले आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला तीन नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले़ सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडल्यावर शेतीचा हंगाम रूळावर येत असतानाच आॅक्टोबर ‘हिट’ने पिके डोळ्यासमोर वाळली़ ऐन सोयाबीन भरणीत पाणी नसल्याने सोयाबिनच्या शेंगांत दाणे भरलेच नाही़ कपाशीला बोंडे लागण्याच्या काळातच कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने आणि आॅक्टोबर तापल्याने कपाशीचे पीक हातचे गेले़
यावर्षी कपाशी व सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात ५० टक्केपेक्षा जादा घट येत आहे़ त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, अशी अवस्था आहे़ अनेक शेतकऱ्यांनी तर शेतीला लावलेला खर्चही निघणे कठीण असल्याचे सांगितले. खरीप हंगाम हातचा गेल्याने रबीत तरी पीक घेऊन थोडीबहूत भरपाई काढू, या आशेवर असलेल्या बळीराजाला परतीच्या पावसाने धोका दिल्याने त्या आशाही मावळल्या आहे़ खरीपात पाऊस कमी पडल्यास, तो परतीत जोरदार बरसतो, असा वयोवृध्द शेतकऱ्यांचा अनुभव़ मात्र तो अंदाजही तालुक्यात खोटा ठरला़
परतीचा तुरळक पाऊस पडल्याने जमिनी कोरड्या पडल्या आहेत़ पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे़ धरणे रिकामी होत आहेत. नाले कोरडे पडले आहे़ विहिरींनी तळ गाठलेला आहे़ त्यामुळे रबीची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ (शहर प्रतिनिधी)