बळीराजा चेतना अभियानाला भ्रष्टाचाराचा डंख
By Admin | Published: September 18, 2016 01:22 AM2016-09-18T01:22:06+5:302016-09-18T01:22:06+5:30
बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
१९ कोटींच्या वितरणात ७७ तक्रारी : नियुक्त संपर्क अधिकारी गावात पोहोचलेच नाही
रूपेश उत्तरवार यवतमाळ
बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. १९ कोटींच्या वितरणात गैरप्रकार झाल्याच्या ७७ तक्रारी आल्या आहेत. अभियानातील निधीबाबत पारदर्शक असण्यासाठी १०१ संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. मात्र, बहुतांश संपर्क अधिकाऱ्यांनी गावाला भेटीच दिल्या नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
अभियानातून महसुली गावांमध्ये प्रत्येकी एक लाख रूपयांचा निधी वळता करण्यात आला. हा निधी गरजवंत शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या. त्याकरिता सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडीसेविका यांच्या संयुक्त बैठकीत मदत वाटपाचा निर्णय घ्यायचा होता. प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जवळच्या नातेवाईकाला मदत वितरित केली. त्याची यादी लावली नाही. ७७ तक्रारी पुढे आल्या आहेत. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मागविला आहे. या तक्रारीवर काय कारवाई झाली, याची माहिती मागविण्यात आली आहे. गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी
बळीराजा चेतना अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि प्रशासन लोकाभिमुख करणे यासाठी १०१ मंडळनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. याकरिता वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यात १६ तहसीलदार, १६ गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, खनिकर्म अधिकारी, नायब तहसीलदार, दुग्ध, नियोजन, औद्योगिक विकास महामंडळ, पुरवठा आणि विक्रीकर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या संपर्क अधिकाऱ्यांनी १३ जूनपासून महिन्यात दोन भेटी देण्याच्या सूचना होत्या. प्रत्यक्षात अनेक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्याच नाही. यामुळे गावातील शेतकऱ्यांची नावे, तेथील प्रश्न आणि उपाययोजनांची माहितीच अधिकाऱ्यांना नाही. यामुळे महत्त्वाकांक्षी अभियानावर परिणाम झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कोणते पाऊल उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.