वगाराचे बांबू बन चोरट्यांच्या हवाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:10 PM2017-11-15T22:10:27+5:302017-11-15T22:10:39+5:30
घाटंजी तालुक्याच्या वगारा(टाकळी) येथील बांबूचे बन चोरट्यांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. बांबूची प्रचंड प्रमाणात कापणी होत असल्याने हे बन विरळ होत चालले आहे.
अब्दुल मतीन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : घाटंजी तालुक्याच्या वगारा(टाकळी) येथील बांबूचे बन चोरट्यांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. बांबूची प्रचंड प्रमाणात कापणी होत असल्याने हे बन विरळ होत चालले आहे. वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) मात्र या बाबीकडे दुर्लक्ष सुरू आहे. चोरीच्या बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंची एसटी बसद्वारे सर्रास वाहतूक सुरू आहे. शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाही कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पहाटे ५ वाजल्यापासूनच बांबू चोरण्यासाठी चोरटे हजेरी लावतात. सूपं, टोपल्या, डाले, तट्टे तयार करण्यासाठी बांबू तोडून नेले जाते. या बनाची राखण करण्यासाठी चौकीदाराची नियुक्ती करण्यात आली. शिवाय वनरक्षकही आहे. यानंतरही बांबूचे बन सुरक्षित ठेवले जात नाही. बनातून तोडलेल्या बांबूपासून बनविलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी लगतच्या आर्णी, किनवट, घाटंजी आदी भागातील खरेदीदार दाखल होतात. बांबूची किंमत मोजावी लागत नसल्याने या वस्तू परिसरातील कारागिरांकडून त्यांना कमी किमतीत उपलब्ध होतात. खरेदी केलेल्या वस्तूंची वाहतूक एसटी बसवरून केली जाते. एसटी कर्मचाºयांकडूनही मात्र या वस्तू कुठल्याही अडचणीशिवाय वाहून नेल्या जातात. या बनातील बांबूचा हर्रास पाच-सहा वर्षांपूर्वी झाला होता. यानंतर याकडे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे.