दारूबंदी झुगारून होते खुलेआम विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 05:00 AM2020-12-10T05:00:00+5:302020-12-10T05:00:07+5:30
महिलांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्ष गावात दारूबंदी कायम राहिली. मात्र थोडी ढील मिळताच दारू विक्रेत्यांनी महिलांना धमकाविणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. यासोबतच पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांची साथ सोडली. यामुळे गावात पुन्हा दारूचा पूर वाहू लागला आहे. आज नागरिकांच्या मनात दारू बंद झाली पाहिजे, असा विचार कायम असला तरी त्याला राबविण्यासाठी हवे असलेले पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याचा गंभीर प्रकार पुढे येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात दारूबंदीची चळवळ २०१५ मध्ये उभी झाली. स्वामिनीसह काही संघटना पुढे सरसावल्या आणि २५० गावांमध्ये दारूबंदी झाली. आज जिल्ह्यातील या गावांसह इतरही गावांमध्ये दारूबंदी आहे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्ष गावात दारूबंदी कायम राहिली. मात्र थोडी ढील मिळताच दारू विक्रेत्यांनी महिलांना धमकाविणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. यासोबतच पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांची साथ सोडली. यामुळे गावात पुन्हा दारूचा पूर वाहू लागला आहे. आज नागरिकांच्या मनात दारू बंद झाली पाहिजे, असा विचार कायम असला तरी त्याला राबविण्यासाठी हवे असलेले पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याचा गंभीर प्रकार पुढे येत आहे.
यवतमाळ तालुक्यातील बोथबोडनमध्ये आजही दारू विकली जाते. पूर्वी हातभट्टी होती आता देशीचे पव्वे गावामध्ये पोहोचत आहेत. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये कायम आहे. यातून गावगाडा विकासाकडे न जाता तो भरकटला जात आहे.
गावकऱ्यांच्या पाठिशीच
ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये दारूबंदी करण्यासाठी आम्ही तयार आहो. गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांना पूर्ण मदत करू. काही ठिकाणी दारूबंदी करण्यात आली आहे. दारूबंदीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- विनायक कारेगावकर,
ठाणेदार, लाडखेड
दारूबंदीच्या निर्णयाची प्रतीक्षा
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात दारूबंदी झालीच नाही. तिला केवळ राजकीय स्वरूप मिळत आहे.
धमक्यांमुळे गाव सोडले
आम्ही पहापळमध्ये दारूबंदी केली. दोन-तीन वर्ष गाव उत्तमरित्या काम करीत होते. महिलांचा चांगला सहभाग होता. पोलीस प्रशासनाची मदत होती. मात्र काही काळानी प्रशासनाची मदत दूर झाली आणि महिलांना धमक्या मिळू लागल्या. या त्रासाला कंटाळून मी गाव सोडले. मात्र काम करण्याची इच्छा अजून आहे.
- भावना नव्हाते,
पांढरकवडा
अजूनही जिद्द कायम
जरूरमध्ये दारूबंदीसाठी आम्ही महिलांनी मिळून काम केले. गावामध्ये दोन ते तीन वर्ष दारूबंदी कायम होती. महिलांवर खोटे आरोप लागले, गुन्हे दाखल झाले. यामुळे महिला खचल्या. आज गावात दारू सुरू आहे. यातून गाव अस्वस्थ झाले आहे. पुढील काळात दारूबंदी व्हावी म्हणून आम्ही महिला काम करणार आहोत.
- ललिता राठोड,
जरूर, ता.घाटंजी
प्रशासनाची मदत नाही
धनज माणिकवाडामध्ये दारूबंदी करण्यात आली. या कामात सर्वांचेच सहकार्य मिळाले. मी आजारी पडलो आणि पुन्हा दारू सुरू झाली. खरं सांगायचे म्हणजे, पोलीस प्रशासनाची आम्हाला मदत मिळत नाही. यामुळे गावात दारू विकल्या जाते. दारूबंदीसाठी गावकरी तयार आहे, पोलीस यंत्रणा सोबत येईल का ?
- अमित दाभेरे,
तंटामुक्ती अध्यक्ष, धनज माणिकवाडा