बंजारा समाज बांधवांचा भाजप, शिवसेनेकडे कल वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:11 AM2019-10-31T11:11:44+5:302019-10-31T11:13:55+5:30
बंजारा समाज बांधवांचा कल भाजप, शिवसेनेकडे वाढल्याचे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बंजारा समाज बांधव म्हणजे एकेकाळी काँग्रेसचे कट्टर समर्थक असे मानले जात होते. परंतु हा समज आता खोटा ठरतो आहे. बंजारा समाज बांधवांचा कल भाजप, शिवसेनेकडे वाढल्याचे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.
जिल्ह्यातील बंजारा बहूल विधानसभा मतदारसंघात केंद्रनिहाय झालेल्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता बंजारा समाजाच्या मतदारांनी भाजप व शिवसेनेला अधिक पसंती दिल्याचे दिसून येते. काही मतदारसंघात तांडेच्या तांडे युतीच्या उमेदवाराकडे वळल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसमध्ये महत्वाच्या पदावर असलेल्या बंजारा समाजाच्या नेत्यांच्या गावांमध्येही काँग्रेस मायनस आणि भाजप, शिवसेना प्लस असल्याचे विसंगत चित्र पुढे आले. खुद्द प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या गावातील ही स्थिती आहे.
वर्षानुवर्षे गृहित धरणे भोवले
काँग्रेस आघाडीवर बंजारा समाजाच्या असलेल्या नाराजीचा कानोसा घेतला असता ‘गृहित धरणे’ हे प्रमुख कारण पुढे आले. वर्षानुवर्षे बंजारा समाजाला काँग्रेसकडून गृहित धरले जात आहे. राज्यात यवतमाळ, वाशिम, नांदेड, सोलापूर, लातूर, अकोला, हिंगोली, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या भागात बंजारा समाज निर्णायक आहे. बंजारा समाजाची लोकसंख्या ८० लाखांवर असल्याचे सांगितले जाते. त्या तुलनेत त्यांना लोकसभा व विधानसभेत प्रतिनिधीत्व दिले जात नाही, अशी ओरड आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास काँग्रेसने बंजारा समाजाच्या एकाही चेहऱ्याला उमेदवारी दिली नाही. वाशिममध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघात एका महिलेला काँग्रेसने उमेदवारी दिली असली तरी ती मूळ बंजारा समाजाला दिलेली उमेदवारी ठरत नाही, असे सांगितले जात आहे. त्या तुलनेत राष्टÑवादी काँग्रेसने पुसदमध्ये इंद्रनील मनोहरराव नाईक, किनवटमध्ये प्रदीप नाईक यांंना उमेदवारी दिली. भाजपने पुसदमध्ये अॅड. नीलय नाईक तर नांदेड जिल्ह्यात तुषार राठोड आणि शिवसेनेने दिग्रसमध्ये संजय राठोड यांना उमेदवारी दिली आहे. त्या तुलनेत काँग्रेसने बंजारा समाजाला उमेदवारीपासून वंचित ठेवल्याचे दिसून येते. याच कारणावरुन बंजारा समाज दिवसेंदिवस काँग्रेसची साथ सोडून भाजप, शिवसेनेकडे वळत असल्याचे चित्र आहे.
कारंजा न दिल्याने हरिभाऊ शिवबंधनात
काँग्रेसकडे हरिभाऊ राठोड यांच्या रुपाने एकमेव आमदारकी होती, मात्र त्यांनीसुद्धा ऐन निवडणुकीच्या काळात शिवबंधन बांधले. हरिभाऊ राठोड यांनी कारंजा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली होती, मात्र ती दिली न गेल्याने नाराज होऊन त्यांनी ‘मातोश्री’ गाठले.
काँग्रेस श्रेष्ठींकडेही मांडली व्यथा
लोकसभा किंवा विधानसभाच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्र, पक्ष संघटना, विविध शासकीय समित्या यावरही बंजारा समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व दिले जात नाही, काँग्रेसच्या मुंबई, दिल्लीतील श्रेष्ठींकडे ही व्यथा अनेकदा मांडलीही गेली. मात्र त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. त्यामुळे बंजारा समाजाने काँग्रेसपासून बहुतांश काडीमोड घेत आता भाजप, शिवसेनेशी अनेक ठिकाणी जवळीक साधल्याचे दिसून येते.
मतदारांचीच आता युतीशी हातमिळवणी
मुळात काँग्रेस नेत्यांनी अनेक ठिकाणी सत्तेसाठी भाजप, शिवसेनेसोबत घरठाव केलाच आहे. यवतमाळात जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समितीत हा घरठाव पॅटर्न राबविला गेला. राज्यात इतरत्रही काही उदाहरणे आहेत. ते पाहून आता जनतेनेच भाजप, शिवसेनेशी हातमिळवणी केल्याचे दिसते. नेत्यांना सोयरसूतक नाही तर समाज बांधवांनी ते का ठेवावे असा बंजारा समाजातील सूर आहे.