बंजारा समाज प्रबोधन पर्वाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:35 PM2018-02-27T23:35:07+5:302018-02-27T23:35:07+5:30
येथील तीर्थरूप मंगल कार्यालयाजवळील संत सेवालालनगरीत आयोजित राज्यस्तरीय तीन दिवसीय बंजारा समाज प्रबोधन पर्व व सांस्कृतिक महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला.
ऑनलाईन लोकमत
आर्णी : येथील तीर्थरूप मंगल कार्यालयाजवळील संत सेवालालनगरीत आयोजित राज्यस्तरीय तीन दिवसीय बंजारा समाज प्रबोधन पर्व व सांस्कृतिक महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारत राठोड, अनिल आडे, राजुदास जाधव, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, रमेश चव्हाण, वनमाला राठोड, आकाश राठोड, आकाश जाधव आदी मंचावर उपस्थित होते. या तीन दिवसीय प्रबोधन पर्वात विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. राज्यात प्रथमच असा कार्यक्रम घेण्यात आला. यात बंजारा समाजाची वैचारिक बांधणी झाली. या प्रबोधन पर्वात जिल्ह्याबाहेरील बंजारा समाजही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
या पर्वादरम्यान लेंगी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पुसद तालुक्यातील बोरगाव येथील संत सेवालाल महाराज चमूने प्रथम क्रमांक पटकावला. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील जय शामकी माता मंडळाने दुसरा, पुसद तालुक्यातील बोरी येथील हासकी माता महिला मंडळाने तिसरा, वाशिम जिल्ह्यातील पांगरी येथील नागनाथ महिला मंडळाने चौथा, बुलडाणा जिल्ह्यातील आसोला येथील जगदंबा लेंगी महिला मंडळाने पाचवा क्रमांक पटकावला. रुई गड येथील जगदंबा महिला मंडळाने सहावा, वसंतनगर दिग्रस येथील प्रताप महिला मंडळाने सातवा, भांब ता.महागाव येथील सामकी माता महिला मंडळाने आठवा क्रमांक पटकाविला. याशिवाय खेडबिड येथील मंडळाला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
पुरुष नृत्य स्पर्धेत दारव्हा तालुक्यातील भोपापूर येथील रसपूत बंजारा मंडळाने पहिला, वाशिम जिल्ह्यातील खापडदरी येथील जय सेवालाल लेंगी मंडळाने दुसरा तर वाशिम जिल्ह्यातीलच भली येथील जय सेवालाल मंडळाने तिसरा क्रमांक पटकावला. उखळी येथील जय सेवालाल मंडळाने चौथा, वाशिम जिल्ह्यातील जय सेवालाल मंडळाने पाचवा, आमला ता.दिग्रस येथील जय सेवालाल महाराज मंडळाने सहावा क्रमांक पटकाविला. या शिवाय मानुदास महाराज लेंगी मंडळ बोरगाव, ज्वालामुखी लेंगी मंडळ वाशिम यांनीही बक्षीस पटकाविले.
या सर्व मंडळांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. संचालन सुरेश पवार तर आभार आकाश जाधव यांनी मानले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.