देशाच्या प्रत्येक भागात बंजारा समाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:36 PM2018-02-24T21:36:52+5:302018-02-24T21:36:52+5:30
देशातील प्रत्येक भागात बंजारा समाज असून समाजाने आता विविध क्षेत्रात प्रगती केली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
आर्णी : देशातील प्रत्येक भागात बंजारा समाज असून समाजाने आता विविध क्षेत्रात प्रगती केली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ते येथील संत सेवालाल नगरीत आयोजित राज्यस्तरीय बंजारा समाज प्रबोधन पर्व व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करताना बोलत होते.
आर्णीत २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले. या पर्वाचे उद्घाटन करताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी देशातील सर्वभागातील बंजारा समाजाची भाषा एकत्र असल्याची सांगितले. काही ठिकाणी भेटी देऊन बंजारा समाज बांधवांशी संवाद साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांची भाषा एकच असल्याने आपसात बंधुभाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या समाज जागृती तथा प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बंजारा समाज विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी शासनाने मदद करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या पर्वाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री मदन येरावार होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात समाजाला दिशा देण्याचे काम युवक करीत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार मनोहरराव नाईक यांनी बंजारा समाजाने आपली भाषा लोप होऊ देऊ नये असे आवाहन केले. समाजाने व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी व्यसनमुक्त समाजाची गरज प्रतिपादित केली. आमदार ख्वाजा बेग यांनी या प्रबोधन पर्वातून समाज जागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी समाजाने विविध क्षेत्रात प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भारत राठोड, अनिल आडे यांनीही विचार व्यक्त केले. राजूदास जाधव यांनी प्रास्ताविकातून बंजारा समाजाची अद्यापही पाहिजे तशी प्रगती झाली नसल्याची खंत व्यक्त केली. संचालन आसाराम चव्हाण, आभार सुरेश पवार यांनी मानले.
प्रेमदास महाराजांना जीवनगौरव पुरस्कार
या समाज प्रबोधन पर्वात प्रेमदास महाराज वनोलीकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. प्रवीण पवार यांच्या ‘गोर स्वाभिमानी, तसेच भीमराव राठोड यांच्या भजन पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या प्रबोधन पर्वात विविध विषयांवर विचार मंथन केले जाणार आहे.