४५ हजार शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस

By Admin | Published: February 13, 2017 01:13 AM2017-02-13T01:13:46+5:302017-02-13T01:13:46+5:30

जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे १२०० कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. त्यातील ४५ हजार शेतकऱ्यांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे.

Bank notice to 45 thousand farmers | ४५ हजार शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस

४५ हजार शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस

googlenewsNext

१२०० कोटींची थकबाकी : मालमत्ता जप्तीची कारवाई
रूपेश उत्तरवार  यवतमाळ
जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे १२०० कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. त्यातील ४५ हजार शेतकऱ्यांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे. अशा शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्ज वसुलीची नोटीस बजावली आहे. या शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत कर्जाची परतफेड न केल्यास, त्यांची गहाण असलेली मालमत्ता जप्त होणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे राज्य शासनाने थकित कर्जाचे पुनर्गठन केले. यानंतरही थकबाकीदार शेतकऱ्यांना थकित कर्जाचा हप्ता भरता आला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात कर्ज वसुलीची नोटीस पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अवसानच गळाले आहे.
उत्तम आणेवारी असल्याचा अहवाल महसूल विभागाने राज्याकडे पाठविला. त्या अहवालाच्या आधारावर बँकांनी थकित कर्जाची वसुली सुरू केली आहे. कलम १०१ अंतर्गत १७, १८ आणि १९ नुसार ही कारवाई शेतकऱ्यांवर होणार आहे. या कलमांनुसार बँकांना शेतकऱ्यांची मालमत्ता जप्त करता येते. त्याचा लिलावही करता येतो.
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय असतानाही ही कारवाई मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांवर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक लाख ५८ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे १२०० कोटी थकित आहे. त्यापैकी ४५ हजार मोठे थकबाकीदार आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली. मार्च अखेरपर्यंत कर्जाचा भरणा करा अथवा मालमत्ता जप्त होईल, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कर्ज माफीच्या प्रस्तावाला केराची टोपली
आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी कर्जमाफीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला. तीन लाख शेतकऱ्यांना साडे आठ कोटी रूपये कर्जमाफीसाठी लागणार होते. तसा प्रस्ताव राज्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर सहा अधिवेशन झाले. मात्र कर्जमाफीच्या विषयावर निर्णयच झाला नाही. राज्याकडे पाठविलेला प्रस्ताव अद्याप धूळ खात आहे.

जिल्हा बँकेला १२०० कोटींच्या थकित कर्जाची वसुली करायची आहे. आत्तापर्यंत केवळ दोन कोटी रूपयांच्याच थकित कर्जाची वसुली झाली. यामुळे थकित कर्जदार शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे.
- अविनाश सिंघम
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा बँक

 

Web Title: Bank notice to 45 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.