चोरटे बँकेत अन् पोलीस रस्त्यावर; चार दिवसांत दुसऱ्यांदा मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:48 PM2022-05-21T17:48:29+5:302022-05-21T18:00:00+5:30
यवतमाळात चोरटे जोमात, पोलीस रस्त्यावर अन् बँक कोमात असे काहीचे चित्र तयार झाले आहे.
यवतमाळ : शहरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. इंदिरा गांधी मार्केटमध्ये वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दोन दिवसांत चारदा चोरटे शिरले. २० मेच्या रात्री पोलीस गस्तीचे वाहन बँकेच्या रस्त्यावर असताना चोरटे बँकेत रोख रक्कम शोधताना दिसून आले. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे गस्तीवरच्या पोलिसांना आझाद मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ काही संशयित दिसतात. त्यांना हटकून पोलीस वाहन पुढे निघून गेले. नंतर चोरीचा प्रयत्न झाला.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी कपाटातून चार लाख ४० हजारांची रोख लंपास केली. त्यावेळी पोलिसांनी या चोरीबाबत अनेक प्रकारचा संशय व्यक्त केला. या घटनेचा छडा लागलाच नाही. विशेष म्हणजे बँकेने ज्या पत्र्याच्या कपाटात रोख ठेवली होती, त्यातील थोडीबहुत रक्कमच चोरट्यांनी नेली. पुन्हा रक्कम नेण्याच्या लालसेने पाच जण बँकेत शिरले. यावेळी त्यांनी खिडकी तोडून प्रवेश केला. सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे स्पष्ट कैद झाले आहेत. मात्र चेहरा पूर्णपणे झाकला असल्याने त्यांची ओळख पटविणे शक्य नाही. दुसऱ्यांदा बँकेत आलेल्या चोरट्यांना हाती एक रुपयाही लागला नाही. त्यांना रिकाम्या हातानेच परत जावे लागले.
२० मेच्या रात्री दोन वाजता पोलीस गस्तीचे वाहन आझाद मैदान प्रवेशद्वारावर आले. तेथे तीन ते चार जणांचे टोळके त्यांना दिसले. या टोळक्याला गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी हटकले व वाहन पुढे निघून गेले. त्यानंतर पाच जण बँकेत शिरले. हे काही मिनिटांच्या अंतरानेच घडले. नंतर पोलीस गस्तीचे वाहन पुन्हा त्याच चौकात आले. त्यावेळी चोरटे बँकेत रोख रकमेचा शोध घेत होते. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आला आहे. यातून पोलिसांच्या रात्रगस्तीचा फोलपणा उघड झाला आहे. रात्री २ वाजता संशयित दिसल्यानंतर त्यांना हटकून सोडून का दिले, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असताना रात्रगस्त अशा पद्धतीने घातली जात असेल तर चोरट्यांचे फावणारच आहे.
बँकेचाही निष्काळजीपणा
बँकेतून चार लाख ४० हजारांची रोख रक्कम चोरीस गेल्यानंतरही महाराष्ट्र बँकेच्या या शाखेतील सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. साधा चौकीदारही बँकेपुढे रात्रपाळीत ठेवण्यात आला नाही. त्यावरून बँकसुद्धा त्यांच्याकडे असलेल्या नागरिकांच्या रोख रकमेबाबत फारशी गंभीर नसल्याचे दिसून येते.