कर्ज नाकारणाऱ्या उमरखेडच्या बँकेची खासदारांपुढे पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:20 PM2018-08-28T22:20:28+5:302018-08-28T22:23:46+5:30
शेतकऱ्यांना कर्ज नाकारण्यासह उर्मट वागणूक देणाऱ्या बँक व्यवस्थापकाची बंदीभागातील शेकडो शेतकऱ्यांनी थेट खासदारांपुढे पोलखोल केली. खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वात व्यवस्थापकाला घेराव घातला. नंतर तहसील कार्यालयात खासदारांनी घेतलेल्या ‘जनता दरबारात’ बँक व्यवस्थापकाच्या विविध कारनाम्यांचा पाढाच वाचण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शेतकऱ्यांना कर्ज नाकारण्यासह उर्मट वागणूक देणाऱ्या बँक व्यवस्थापकाची बंदीभागातील शेकडो शेतकऱ्यांनी थेट खासदारांपुढे पोलखोल केली. खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वात व्यवस्थापकाला घेराव घातला. नंतर तहसील कार्यालयात खासदारांनी घेतलेल्या ‘जनता दरबारात’ बँक व्यवस्थापकाच्या विविध कारनाम्यांचा पाढाच वाचण्यात आला.
दराटी गावातील नागरिकांनी उमरखेड येथील सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक ए. आय. कनवर यांच्या वागणुकीबाबत खासदार राजीव सातव यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत खासदारांनी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार भगवान कांबळे, सहायक निबंधक भालेराव व शेकडो तक्रारकर्त्यांसह बँक व्यवस्थापकांना धारेवर धरले.
व्यवस्थापकाच्या कारभाराचा फटका सहन केलेले ८० वर्षीय भिकू राठोड यांनी आपबिती सांगतांना म्हटले की, माझ्यावर एकही रुपया कर्ज नाही. मी कर्जासाठी बँकेच्या साहेबाजवळ गेलो. तर मला स्वत: त्यांनी धक्के देऊन बाहेर काढले. अशाच प्रकारच्या तक्रारी शेकडो जणांनी मांडल्या. कर्जमाफीची यादी बँकेत न लावणे, येणाऱ्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कार्यवाहीची धमकी देणे, ग्राहकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, यासोबतच शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवणे असे गंभीर आरोप त्यांच्यासमक्ष नागरिकांनी केले. तर त्यांनी यापूर्वी उमरखेड, दराटी पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी देऊन ग्राहकावर गुन्हे नोंद केल्याचीही माहिती खासदार सातव यांना देण्यात आली.
यावेळी माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, दत्तराव शिंदे, प्रेमराव वानखेडे, सोनू खतीब, किशोर चवरे, नंदकिशोर अग्रवाल, बालय्या दुर्गमवार, जुबेर कुरेशी, शे. तालीब आदी उपस्थित होते.