बनावट शिक्के वापरुन न्यायालयातून गुन्हेगारांच्या जमानती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:21 PM2018-09-13T22:21:35+5:302018-09-13T22:22:23+5:30

बनावट रबरी शिक्के व कागदपत्रे बनवून चक्क चार न्यायालयांमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या जमानती घेतल्या गेल्याचा खळबळजनक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी यवतमाळ-अमरावती मार्गावरील सोनवाढोणाच्या (ता. नेर) दोघांना अटक करण्यात आली आहे.

Bank robbery using fake stamps! | बनावट शिक्के वापरुन न्यायालयातून गुन्हेगारांच्या जमानती !

बनावट शिक्के वापरुन न्यायालयातून गुन्हेगारांच्या जमानती !

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : विविध शासकीय कार्यालयांचे ५७ शिक्के जप्त, योजनांचाही घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बनावट रबरी शिक्के व कागदपत्रे बनवून चक्क चार न्यायालयांमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या जमानती घेतल्या गेल्याचा खळबळजनक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी यवतमाळ-अमरावती मार्गावरील सोनवाढोणाच्या (ता. नेर) दोघांना अटक करण्यात आली आहे.
दत्ता अनंत तडसे (४०) व किसन भीमराव सातपुते (४८) दोन्ही रा. सोनवाढोणा अशी आरोपींची नावे आहे. त्यांच्या घराची झडती घेतली असता विविध शासकीय कार्यालयांच्या नावाचे बनावट रबरी शिक्के आढळून आले. ते ५७ शिक्के जप्त केले गेले. याच बनावट सही-शिक्यांच्या आधारे या आरोपींनी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे हे शेतकरीही आता अडचणीत येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दत्ता व किसन या दोघांविरुद्ध लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या आरोपींनी यवतमाळ, दारव्हा, नेर, वर्धा येथील न्यायालयामधून अनेक गुन्हेगारांच्या जमानती घेतल्या. पोलिसांनी घातक शस्त्रे, रिव्हॉल्वरसह आरोपींना अटक करायची व या दोघांनी बनावट कागदपत्रांद्वारे त्यांची जमानत घ्यायची, असे काही प्रकार पुढे आले. आपण केलेल्या गुन्ह्यांची या दोन्ही आरोपींनी पोलिसांनी कारवाईच्या वेळी सोबत नेलेल्या पंचांसमक्ष स्पष्ट कबुलीही दिली. या आरोपींनी एक नव्हे तर चार आणि एकदा नव्हे तर अनेकदा चक्क न्यायालयांचीसुद्धा फसवणूक केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुरज बोंडे, मंगेश भोयर, सहायक फौजदार ओमप्रकाश यादव, जमादार बंडू डांगे, पोलीस नायक विशाल भगत, प्रशांत हेडावू, पोलीस शिपाई शुभम सोनुर्ले, सुधीर पिदूरकर, महिला पोलीस शिपाई अर्पिता चौधरी यांनी हे धाडसी डिटेक्शन केले.
बँक, बीडीओ, अभियंते, तलाठी, ग्रामसेवक, आदिवासी प्रकल्पाचे बनावट शिक्के
सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा उत्तरवाढोणा, विस्तार अधिकारी पंचायत समिती, गटविकास अधिकारी पंचायत समिती, तलाठी जांब, तलाठी सोनवाढोणा, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सोनवाढोणा, मालखेड खुर्द ग्रामविकास कार्यकारी संस्था, सचिव मालखेड खुर्द, विशेष कार्यकारी अधिकारी, सचिव ग्रामपंचायत सोनवाढोणा, ग्रामपंचायत कार्यालय सोनवाढोणा आदी १७ बनावट रबरी शिक्के आरोपी दत्ता तडसे याच्या घरातून पोलिसांनी जप्त केले. जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता यवतमाळ, तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय बारडतांडा, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा, महा ई-सेवा केंद्र यवतमाळ, गटविकास अधिकारी पंचायत समिती यवतमाळ व नेर, विस्तार अधिकारी पंचायत समिती यवतमाळ, झरीजामणी व दारव्हा, सचिव ग्रामपंचायत अर्जुनी, टाकळी, घुबडी, चिखलदरा, हिवरा, उमरी पोड, सुर्ला, बहात्तर, कोळंबी, भोसा, शिबला, डोर्ली, कार्यकारी अभियंता यवतमाळ पाटबंधारे विभाग यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वाई(च) प्रकल्प पांढरकवडा, सरपंचा ग्रामपंचायत आदी बनावट रबरी शिक्के किसन सातपुते याच्या घरातून जप्त करण्यात आले. याशिवाय कोरे घर टॅक्स वसुली पावती बुक, कोरे मृत्यू प्रमाणपत्र दाखले, कोरे नो-ड्यूज सर्टिफिकेट, कोरे सातबारा, बनावट सातबारा, गाव नमुना, उपसा सिंचन पाणी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे प्रमाणपत्र आदी बनावट कागदपत्रे आरोपींच्या घरातून जप्त करण्यात आली. त्याच्या उपयोगिता पोलिसांकडून तपासली जात आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे शेतकऱ्यांना बँकांचे कर्ज
दत्ता तडसे व किसन सातपुते यांनी बनावट रबरी शिक्के व कागदपत्रांच्या आधारे सेंट्रल बॅक आॅफ इंडियातून अनेक शेतकºयांना कर्ज मिळवून दिले. या आरोपींनी आदिवासी प्रकल्प पांढरकवडा, आदिवासी विकास महामंडळ यवतमाळ येथून पाईप, आॅईल इंजीनचा लाभ अनेकांना मिळवून दिला. याशिवाय बीपीएल प्रमाणपत्र व पाणी परवानेसुद्धा बनवून दिले. हे रबरी शिक्के त्यांनी नेमके कुठे बनविले व कोणकोणत्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
जामिनातून लागला ‘क्ल्यू’, दोन महिने मागावर
स्थानिक गुन्हे शाखेने २९ जुलै रोजी अनिकेत वैद्य व भूषण साखरे या दोघांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून देशीकट्टा जप्त करण्यात आला. आॅगस्ट महिन्यात त्यांना जामीन मिळाला. त्यासाठी सातबारा सादर केले गेले. परंतु हे सातबारा बोगस असल्याची कुणुकण पोलिसांना लागली. म्हणून त्यांनी महसूल खात्यामार्फत या सातबाराची उलट तपासणी केली असता दत्ता व किसन यांच्या कारनाम्यांचा भंडाफोड झाला. पोलीस दोन महिन्यांपासून या आरोपीच्या मागावर होते. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली.

Web Title: Bank robbery using fake stamps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.