बोगस कपाशी बियाणे विक्रेत्यांचा धुमाकूळ; तिघांवर गुन्हा दाखल
By विशाल सोनटक्के | Published: May 30, 2024 05:22 PM2024-05-30T17:22:26+5:302024-05-30T17:22:52+5:30
वडकी पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दोघे जण कोठारी (ता. बल्लारशहा, जि. चंद्रपूर) येथून शासनाने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कपाशी बियाणे विक्रीकरीता बाळगून असल्याची माहिती मिळाली.
यवतमाळ : शासनाने प्रतिबंधित केलेले कपाशी बियाणे विक्रीकरीता बाळगल्याप्रकरणी पोलिस पथकाने तिघा जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी आठ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राळेगाव तालुक्यात करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वडकी पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दोघे जण कोठारी (ता. बल्लारशहा, जि. चंद्रपूर) येथून शासनाने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कपाशी बियाणे विक्रीकरीता बाळगून असल्याची माहिती मिळाली. यावरून कृषी विभागाचे अधिकारी तसेच त्यांच्या पथकास सोबत घेवून स्थानिक गुन्हे शाखेेने खैरी बसस्थानक येथे सापळा लावला. यावेळी एम.एच.४१/एई-६१९६ या क्रमांकाची कार खैरी बसस्थानकाकडे येताना दिसली. पथकाने ही गाडी थांबविली. यामध्ये सावित्री पिंपरी येथील विलास नानाजी देवेवार (वय ४०) आणि अविनाश संतोषराव निकम (२९) हे दोघे जण होते. वाहनाची झडती घेतली असता मागील सीट समोरील मोकळ्या जागेत एका प्लास्टिक पोत्यात सुमारे ३३ किलो खुले कपाशी बियाणे आढळून आले. या बियाण्यांची किंमत एक लाख पाच हजार एवढी आहे. या दोघांनी सदर बियाणे सागर अरुण पार्लेवार (कोठारी, जि. चंद्रपूर) यांच्याकडून आणल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत वणी पोलिस ठाण्यात तिघा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिरपूर हद्दीतही १५ पाकिटे आढळली
शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेवून कारवाई केली. येथे वणी तालुक्यातील अमोल विजय चिकणकर (वय ३३) याच्याकडून बलवान रिसर्च हायब्रीड कॉटन सिड ५-जी या १८ हजार रुपये किमतीच्या अनधिकृत बियाण्याचे १५ पाकीट आढळले. या प्रकरणी चिकणकर याच्याविरूद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.