३३३ दुकानांमधून दारूविक्री बंद
By admin | Published: April 2, 2017 12:18 AM2017-04-02T00:18:40+5:302017-04-02T00:18:40+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ३३३ दुकानांमधून होणारी दारूविक्री
एक्साईजची कारवाई : गोदामांना ठोकले सील, सर्वाधिक वणी-पुसद
यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ३३३ दुकानांमधून होणारी दारूविक्री शनिवार १ एप्रिलपासून बंद झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सकाळपासूनच या दुकानांना सील ठोकण्याची मोहीम हाती घेतली होती. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सर्वोच्च न्यायालयाने अपघाताच्या वाढत्या घटनांना महामार्गावर होणारी दारू विक्री जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महामार्गावरील दारूची ही सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासून जिल्ह्यात सुरू झाली. जिल्ह्यात देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने, बीअर शॉपी, वाईनबार असे ५२४ परवानाधारक आहेत. त्यातील ३३३ परवानाधारक सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामध्ये देशी दारू विक्रेते ९३, वाईन शॉप नऊ, बार-परमीट रुम १९३ व ३८ बीअर शॉपीचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक दुकाने ही वणी, पुसद विभागातील असल्याचे सांगितले जाते. उर्वरित १९१ परवानाधारकांना दारू विकण्याची मुभा राहणार आहे. कारण ते महामार्गापासून ५०० मीटरच्या आत येत नाहीत. यवतमाळ शहरातील प्रमुख मार्गांवर असलेल्या दारू विक्रेत्यांनी मात्र सत्ताधारी राजकीय मार्ग वापरुन या कारवाईतून स्वत:चा बचाव करून घेतला आहे. त्यात मोठी ‘उलाढाल’ झाल्याचे लिकर लॉबीतून सांगण्यात येते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी सकाळपासून बंदीच्या यादीतील ३३३ दारू विक्री दुकाने, शॉपी, बारची तपासणी सुरू केली. रेस्टॉरन्टला अटॅच असलेल्या वाईनबारच्या गोदामाला सील ठोकण्यात आले. जेथे साठा नाही त्यांना निलचा दाखला दिला गेला. (जिल्हा प्रतिनिधी)