लेकरं बेमार.. म्हतारे राखनीले... न् झोपडं बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:41 AM2017-10-09T00:41:01+5:302017-10-09T00:42:52+5:30
नईतरुन पोरं बेमार पल्ले बाप्पा... आमी म्हतारे त्याह्यच्यासंग दवाखान्यात राखनीले बसून हावो. मजुरी नाई न् फजुरी नाई... मजबुरी हाये. आमच्यासाठी फवारले गेल्ता आता त्येच्यासाठी आमीस आलो..
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नईतरुन पोरं बेमार पल्ले बाप्पा... आमी म्हतारे त्याह्यच्यासंग दवाखान्यात राखनीले बसून हावो. मजुरी नाई न् फजुरी नाई... मजबुरी हाये. आमच्यासाठी फवारले गेल्ता आता त्येच्यासाठी आमीस आलो.. घरात काय शिजत असन काय सांगाव? लोकं येऊन भेटून चाल्ले, त्याह्यच्या येण्यानं तब्येतय सुधरत नाई अन् मजुरीबी भेटत नाई...पुढ का का घडन का सांगू बाप्पा...
फवारणीतून विषबाधीत झालेल्या गोरगरिबांना दररोज भेटी देणाºया व्हीआयपी मंडळींच्या काळजाला दिग्रसच्या (बेलोरा) वृद्ध वच्छलाबार्इंची ही व्यथा पाझर फोडू शकेल का? वच्छलाबार्इं भरभडे यांचा तरुण मुलगा दसºयाच्या आदल्या दिवशी फवारणीच्या मजुरीला गेला होता. पण विषबाधा झाली. मुलगा दवाखान्यात सून बाळंतपणाला माहेरी अन् म्हाताºया वच्छलाबाई मुलासोबत...ही वृद्ध आई म्हणाली, ‘दहा दिस झाले, आमी कोनीस मजुरीले नाई गेलो. घरी लहान लेकरू हाये.. काय रांधत असन अन् काय खात असन देवालेस ठाऊक. येच्या ईलाजाले पैसे नोहोते. याले दोनशे मांग, त्याले दोनशे मांग असं करूनश्यानं गाडं लोटत होवो..!’ फवारणीच्या मजुरीला जाणारे अन् त्यात विषबाधा झालेले सारेच गावाकडचे तरुण आहेत. असे शेकडो तरुण आज शासकीय रुग्णालयात तडफडत आहेत. त्यांच्याकडे काळजीने पाहात, डोळे पुसत बसलेले म्हातारे आईवडील नातवांचे चेहरे आठवून आठवून देवाची करुणा भाकत आहेत.
‘नयीतरुन पोरं फवारणीनं भोकने होऊने बसले... सरकार पैसे देईन म्हंते. पण थ्या पैशाले का चाटन का त्याह्यचे बायकापोरं? पुढं एवढं मोठं आयुष्य हाये...’ बाजूच्याच बेडवरच्या बाधीत तरुणाची आई चंद्रकला कातावून बोलल्या, ‘आत्ताशीनच येक कोन हो का तं नेताजी येऊन गेला. मत मांगतल्यावानी टोंडाकडं पाहे.. माहा पोरगं ढोरावानी बोंबलते.. आग आग म्हंते.. अन् ह्ये नेताजी म्हने न्याय भेटन.. अगा कवा भेटन थो न्याय? पोटासाठी डोळे देल्ले आता डोळ्यायसाठी जीव घेसान का?’
विषबाधेने कळवळणाºया पोरांकडे पाहून म्हाताºया आईवडिलांवरच जीव सोडण्याची वेळ आली आहे. पण राजकीय पक्षांचे पुढारी राजकीय बॅनर लावूनच त्यांच्या भेटी घेत आहेत. भेटी देणारे केवळ सुतकी चेहरे करून उभे राहतात आणि खूप मोठी समाजसेवा केल्याच्या आविर्भावात आले तसे निघून जातात. त्यांचे कोरडे शब्द संतापाचे कारण ठरत आहेत. तोच संताप पती गमावलेल्या कळंबच्या मंगला देवीदास मडावी या महिलेने व्यक्त केला, बारा दिवसापासून रोज लोकं आमाले भेटाले येऊन राह्यले. मंग आमाले कामाले कसं जाता येईन? कामावर गेलो तरी पोलीस धरू-धरू घरी आणते. तुमी लोकं येता, पण माही मजुरी बिडते अन् तुमी तरी का देता? काल तं माह्याजवळ तेल न् चहापत्ती घ्याले पैसे नव्हते. १० रुपये उसने घेतले अन् दिवस ढकलला...’
तिवसाचा ब्रह्मानंद श्रीराम आडे, कोची ता. राळेगावचा अरुण नागोजी आत्राम हे डोळे गमावून बसले आहे. त्यांच्याच बाजूच्या बेडवर तळणीचा (ता. आर्णी) राहुल पंजाब मंगल पवार हा तरुणही विव्हळत आहे. आपल्या वेदना तो रोज नातेवाईकांना मोडक्या तोडक्या भाषेत कागदावर लिहून सांगतोय. ‘गळ्यात काहीतरी लटकल्यासारखं वाटते’ हे त्याचे शब्द डॉक्टर, कृषी अधिकारी, कृषीमंत्र्यांना कळतील का?
उत्सवी कार्यकर्त्यांनो, माणसांना मदत करा
सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली, अजून भेटली नाही. जिवंत माणसं तळमळत आहे. त्यांना केवळ राजकीय भावनेतून भेटी देण्याचा सपाटा सुरू आहे. सरकार तर झोपलेले आहेच. पण यवतमाळच्या समाजिक संस्थाही निपचित आहेत. एकाही संस्थेने रुग्णालयात जाऊन रुग्णांची वास्तपूस्त केली नाही, की नातेवाईकांच्या जेवणाची सोय केली नाही. इतर उपक्रमांवर भरमसाठ खर्च करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांनी जिवंत माणसांसाठी काहीतरी करण्याची आता वेळ आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या गरिबांसाठी आता पुढे यावे, असे मत शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी व्यक्त केले.