मुलांच्या हाती मोबाइल द्याल तर खबरदार! ग्रामपंचायतीचा ठराव : पालकांचे समुपदेशन, नंतर दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 09:32 AM2022-11-17T09:32:27+5:302022-11-17T09:32:53+5:30
Mobile: संवादाऐवजी मनोरंजन आणि गैरवापरासाठीच मोबाइलचा वापर होऊ लागल्याने बान्शी ग्रामपंचायतीने १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाइलबंदी करण्याचा ठराव मंजूर केला.
- बालाप्रसाद सोडगिर
बेलोरा (जि. यवतमाळ) : संवादाऐवजी मनोरंजन आणि गैरवापरासाठीच मोबाइलचा वापर होऊ लागल्याने बान्शी ग्रामपंचायतीने १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाइलबंदी करण्याचा ठराव मंजूर केला. यासाठी मुलांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्यानंतरही तरुणाईकडून मोबाइलचा वापर न थांबल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे.
पुसद तालुक्यातील बान्शी ग्रामपंचायतीने थेट ग्रामसभेत ठराव घेऊन १८ वर्षांखालील मुलामुलींना मोबाइलचा वापर करण्यास मनाई केली आहे. मंगळवारी झालेल्या याच ग्रामसभेत गावात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेत निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा संकल्पही करण्यात आला. मोबाइलचा गैरप्रकारांसाठी वापर होत असल्याच्या घटना पुढे आल्यानंतर ग्रामस्थांनी १८ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालायला हवी, अशी मागणी केली. ही मागणी सरपंच गजानन टाले यांच्यासह सदस्यांनी उचलून धरली. मोबाइल वापरावर बंदी घातल्यास विद्यार्थी अभ्यासाकडे वळतील तसेच पारंपरिक मैदानी खेळांमधील रुची त्यांच्यात पुन्हा वाढेल, या हेतूनेच ग्रामपंचायतीने मोबाइलबंदीचा हा ठराव घेतला असल्याचे सरपंच टाले आणि उपसरपंच रेखा राठोड यांनी सांगितले.
अनेक विद्यार्थी तासन् तास पब्जीसह इतर खेळ खेळत असल्याचे दिसून आले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होऊ लागल्याने ग्रामपंचायतीला मोबाइल वापर बंदीचा ठराव घ्यावा लागला.
. - रेखा राठोड, उपसरपंच, बान्शी, ता. पुसद, जि. यवतमाळ
गावाच्या हितासाठीच मोबाइलबंदीचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येईल. त्यानंतरही १मुलांकडून मोबाइलचा वापर न थांबल्यास दंडात्मक कारवाईसह वाढीव टॅक्स लावण्यात येईल.
- गजानन टाले, सरपंच, बान्शी, ता. पुसद, जि. यवतमाळ