सर्च इंजिनवर घ्या काळजी; आठ जणांना १३ लाखांचा घातला ऑनलाइन गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 04:41 PM2023-08-07T16:41:04+5:302023-08-07T16:41:38+5:30

व्यावसायिकांनाच मोठा आर्थिक फटका : कस्टमर केअर क्रमांक शोधणे धोक्याचे

Be careful on search engines; 13 lakhs online scam to eight people | सर्च इंजिनवर घ्या काळजी; आठ जणांना १३ लाखांचा घातला ऑनलाइन गंडा

सर्च इंजिनवर घ्या काळजी; आठ जणांना १३ लाखांचा घातला ऑनलाइन गंडा

googlenewsNext

यवतमाळ : ऑनलाइन व्यवहारात सहजता आलेली आहे. छोट्या शहरातून महानगरांमध्ये प्रत्यक्ष न जाता मोठमोठे व्यवहार केले जातात. यामुळे स्थानिक किरकोळ व्यावसायिक, ठोक व्यावसायिक, विविध वेबसाइटच्या माध्यमातून व्यवहार करतात. असे करीत असताना सर्च इंजिनची मदत घेणे धोकादायक ठरू शकते. याच व्यवहारातून फसवणूक झालेल्यांची संख्याही वाढत आहे. सात महिन्यांत आठ जणांना १३ लाखांचा गंडा घातला गेला आहे.

इंडिया मार्ट सारख्या विविध वेबसाइटचा वापर, स्थानिक उद्योजक, व्यावसायिक करीत असतात. यावर अनेक ब्रँडची उत्पादने उपलब्ध असतात. मोठ्या वाहन कंपन्यांची फ्रॅन्चायजी मिळविणे, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी असे अनेक व्यवसाय या वेबसाइटच्या माध्यमातून करण्याची संधी असते. याचाच शोध घेत असताना सर्च इंजिनच्या मायाजालात गफलत होते. चुकीच्या व्यक्तीचा संपर्क येऊन तो पद्धतशीरपणे जाळ्यात ओढतो. व्यवहार करताना अगदी एखाद्या मान्यताप्राप्त कंपनीशी आपण डिल करतोय, असे वाटते. त्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर पैशाची मागणी केली जाते. बँकेच्या अकाउंटमध्ये हा पैसा बोलविले जातो. त्यामुळे संशय येण्याचे काम राहत नाही. पैसे आल्यानंतर मात्र अशा कुठल्या कंपनीचा व्यवहारच झाला नाही, हे उघड होते. त्यावेळी ज्या व्यक्तीसोबत व्यवहार केला, ती फोन, मेल, व्हाॅट्सअॅप यावर उपलब्ध होत नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतरच पोलिसांत धाव घेतली जाते.

इंटरनेटचा वापर करून सर्च इंजिनवर मिळणारी प्रत्येक माहिती खरी आहे, असे सांगता येत नाही. बरेचदा मोठ्या मोठ्या ब्रँडच्या नावाने ठगबाज आपले क्रमांक, मेल अपलोड करतात, अशांच्या संपर्कात आल्यानंतर अलगद जाळ्यात ओढून फसवणूक केली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यवहार करताना व्यक्तीश: जाऊन खात्री केलेली केव्हाही फायद्याची राहते. किमान स्थानिक कार्यालयातून याबाबत पडताळणी करूनच पुढचे निर्णय घ्यावे.

काय आहे सजेस्ट अँड एडिट पर्याय?

सर्च इंजिनवर ‘सजेस्ट अँड एडिट’ पर्यायाचा फटका युजर्सना बसत आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात ऑनलाइन ठगांनी आठ जणांना फसविले आहे.

अशी घ्या काळजी

सर्च इंजिनवर कुणालीही अॅड देता येते. स्वत:चे क्रमांक टाकता येतात, हे लक्षात ठेवूनच त्यावरील कस्टमर केअर व हेल्पलाइन नंबर शोधावे, शक्यतोवर असे नंबर वापरूच नये.

ठगांनी नेलेल्या १३ लाखांपैकी पाच लाख होल्ड करण्यात यश

ठगांनी ऑनलाइन फसवणूक करून १३ लाख रुपये उडविले. याची तक्रार सायबर सेलकडे आली. सायबर टीमने यातील पाच लाख ४० हजार एवढी रक्कम होल्ड केली आहे.

ऑनलाइन शॉपिंग करताना, सर्च करताना घ्या काळजी

कारची डिलरशीप : किया या वाहन कंपनीची डिलरशीप घेण्यासाठी एकाने ऑनलाइनवर व्यवहार केला. त्याला जवळपास आठ लाख ३६ हजाराने गंडविण्यात आले. आता हे प्रकरण सायबर सेलकडे तपासाला आले आहेत. फसवणूक झाल्यानंतरच पडताळणी केली गेली.

कस्टमर केअरचा नंबर : सर्च इंजिनवर कस्टमर केअरचा नंबर शोधणे महागात पडले. पेटीएमवरून पाठविलेल्या रकमेत तफावत आली. हेल्पलाइनचा नंबर मिळविण्यासाठी गुगलवर सर्च केले. यात ठगाच्या हाती लागल्याने एक लाख ७५ हजारांचा फटका बसला आहे.

क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करताना भुर्दंड : क्रेडिट कार्ड अचानक बंद पडले. ते अॅक्टिव्ह करण्यासाठी कस्टमर केअर, हेल्पलाइन नंबरचा शोध घेतला गेला. यातही ठगाशी संपर्कात आल्याने त्याने पद्धतशीरपणे मोबाइल अॅक्सेस मिळविण्यासाठी लिंक पाठविली. या माध्यमातून बँक खात्यातून दोन लाख काढून घेतले.

पहिला व्यवहार तरी प्रत्यक्ष करावा

व्यवसायाशी निगडित प्रक्रिया, व्यवहार करताना एकदा तरी प्रत्यक्ष जाऊन संबंधित कंपनी व तेथील संपर्क क्रमांक याची पडताळणी करावी, नंतर ऑनलाइनची मदत घेतल्यास अडचण येत नाही. फसवणूक झाल्यास तत्काळ टोल फ्री क्रमांक १९३०वर तक्रार नोंदवावी.

- विकास मुंढे, सायबर सेल प्रभारी

Web Title: Be careful on search engines; 13 lakhs online scam to eight people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.