सावधान ! चोरट्यांनी मारला 42 लाखांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 05:00 AM2022-04-18T05:00:00+5:302022-04-18T05:00:17+5:30

शेतातील मोटारपंप, धान्यसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. शेळ्या, बैल, गाई यांचीही सर्रास चोरी केली जात आहे. याचा एकही गुन्हा उघड झालेला नाही. शेतकरी व गोरगरीब वर्गही आता चोरट्यांमुळे धास्तावलेला आहे. पूर्वी एका ठराविक वर्गालाच चोरांची भीती राहत होती. परिस्थिती त्या पलीकडे गेली आहे. चोरच पोलिसांवर भारी पडत आहे, अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.  ग्रामीण भागातील नागरिक वाढत्या चोऱ्यांमुळे दहशतीत वावरत आहे.

Be careful! Thieves kill over Rs 42 lakh | सावधान ! चोरट्यांनी मारला 42 लाखांवर डल्ला

सावधान ! चोरट्यांनी मारला 42 लाखांवर डल्ला

Next

सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील ३१ ही पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करून घेण्यापलीकडे कुठलीही कारवाई केली जात नाही. नागरिकांनी स्वत:हून एखादा चोर पकडून दिला तर त्याला दोन-तीन गुन्ह्यांत सहभागी दाखवून तपास पूर्ण केला जातो. चोरी गेलेला मुद्देमाल कधीच शोधला जात नाही. अपवादानेच तो एखाद्या प्रकरणात हाती लागतो. पोलीस गुन्ह्यांचा तपास करणे विसरले की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. 
१७ दिवसांमध्ये चोरीच्या ४१ घटना घडल्या आहेत. यात शहरी, ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश आहे. सातत्याने चोरी होत असूनही चोर मिळत का नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 
शेतातील मोटारपंप, धान्यसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. शेळ्या, बैल, गाई यांचीही सर्रास चोरी केली जात आहे. याचा एकही गुन्हा उघड झालेला नाही. शेतकरी व गोरगरीब वर्गही आता चोरट्यांमुळे धास्तावलेला आहे. पूर्वी एका ठराविक वर्गालाच चोरांची भीती राहत होती. परिस्थिती त्या पलीकडे गेली आहे. चोरच पोलिसांवर भारी पडत आहे, अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.  ग्रामीण भागातील नागरिक वाढत्या चोऱ्यांमुळे दहशतीत वावरत आहे. पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करण्याची गरज आहे. 

सर्वसामान्यांच्या मालमत्ता संरक्षणासाठी गस्त घालणारे पोलीसच चोरांच्या रडारवर आहे. थेट पोलीस ठाण्यातून दुचाकी चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेली आहे. सध्या जिल्ह्यात काय चालू आहे असे कोणी विचारले तर चोरांचीच चलती असल्याचे सहज उत्तर निघते. एप्रिल महिन्यातील १७ दिवसांत चोरट्यांनी ४१ ठिकाणी चोरी केली. त्यामध्ये ४१ लाख ७८ हजार ७३८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरांपासून घर, शेत, गोठा, जनावर, वाहन, बँक, एटीएम, निर्जनस्थळ, गर्दीची ठिकाणे इतकेच काय पोलीस ठाणे हेसुद्धा सुरक्षित नाही. चोरी होणारच नाही अशी कुणी हमी देऊ शकत नाही. एवढी दहशत चोरट्यांची निर्माण झाली आहे. घरात चोरी होते म्हणून सोबत दागिने घेतले तर प्रवासातही ते चोरीला जातात. अशा दोन घटना १७ दिवसांच्या अवधीत घडल्या आहेत. 

१७ दिवसात केवळ चार गुन्हे उघड 
- १ ते १७ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात दुचाकीचोरीच्या १३ घटना तर चारचाकी वाहनचोरीची एक घटना घडली आहे. याशिवाय घरफोडी, लुटमार या घटना ४१ आहेत. यातील केवळ चार गुन्ह्यांचा पोलिसांना छडा लावता आला आहे. 
- घाटंजी पोलीस रात्रगस्त करीत असल्याने दुकान फोडणारे चोरटे रंगे हाथ त्यांच्या हाती लागले. झटापटीत दोन जण पळून गेले. दोघांना अटक करता आली. विशेष म्हणजे मुद्देमाल त्यांच्याजवळ मिळून आला. 
- पारवा पोलिसांनी फिरते पोलीस ठाणे उपक्रमातून वाटमारीची घटना उघड केली. आरोपी अटक केला. पुसद ग्रामीण पोलिसांनी घोन्सरातील वृद्धेचा गळा चिरणाऱ्या दोघांना अटक केली. 

१४ वाहने गेली चोरीला 
- वाहन सार्वजनिक ठिकाणी ठेवा, पोलीस ठाण्यात ठेवा, स्वत:च्या घरात ठेवा, चोरटे ते लांबविल्याशिवाय राहत नाही. एप्रिल महिन्यात १७ दिवसांत १४ वाहने चोरीला गेली. यामध्ये १३ दुचाकी व एका कारचा समावेश आहे. दिग्रसमधील दुद्दलवार यांची मैदान उभी असलेली कार चोरट्याने नेली. याची तक्रार दाखल करून दहा दिवस लोटले आहे. अद्याप शोध लागलेला नाही. दुचाकी चाेरीबाबत तर सांगायलाच नको. तक्रार द्या आणि विसरून जा. 

शाळा, अंगणवाडीसुद्धा लक्ष्य
- चोरटे गावखेड्यातील शाळा, अंगणवाड्यासुद्धा सोडायला तयार नाही. तेथील शैक्षणिक साहित्य सर्रास लंपास केले जात आहे. महागाव येथील मेंढीतील जिल्हा परिषद शाळा, नेर तालुक्यातील वाई इजारा येथील अंगणवाडीतही चोरी झाली. याशिवाय १७ दिवसांत आठ घरफोड्या झाल्या आहेत. पुसद, राळेगाव, कळंब, पांढरकवडा, यवतमाळ या शहरांमध्ये गुन्हे घडले आहेत. रोख, किमती मुद्देमालासोबतच धान्याचीही चोरी वाढली आहे. तूर, सोयाबीन, कापूस, शेतातील मोटारपंप, तुषारसंच घेऊन चोरटे पसार होत आहे. सार्वजनिक उत्सव रॅलीमध्येही हात साफ करीत आहे.

 

Web Title: Be careful! Thieves kill over Rs 42 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर