कोसदणी घाटातून प्रवास करताना सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:50 AM2021-09-07T04:50:53+5:302021-09-07T04:50:53+5:30
फोटो आर्णी : नागपूर ते तुळजापूर महामार्गावरील कोसदणीचा घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या घाटात डोंगराची कडा कोसळून ...
फोटो
आर्णी : नागपूर ते तुळजापूर महामार्गावरील कोसदणीचा घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या घाटात डोंगराची कडा कोसळून कधी अपघात हेईल, याचा नेम नाही.
आर्णीपासून केवळ १५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर कोसदणी घाट आहे. या घाटातून प्रवास करताना प्रवाशांना भीती वाटते. नागपूर ते तुळजापूर हा चार पदरी रस्ता झाल्याने वाहनधारकांमध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु कोसदणी घाटातून प्रवास करताना अनेकांचा जीव टांगणीला लागत आहे.
पूर्वी हा घाट म्हणजे अपघातस्थळ झाले होते. या घाटात अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत; परंतु चार पदरी रस्ता झाला आणि घाटाचा कायापालट झाला. जुन्या रस्त्याला लागून असलेला डोंगर फोडून आता नवीन रस्ता तयार झाला. हा रस्ता प्रवासाच्या आनंदात भर टाकणारा ठरला. मात्र, रस्त्यालगतचा डोंगर खूप धोकादायक ठरत आहे. जवळपास १७० फूट उंचीची डोंगराची दरड दोन्ही बाजूने उभी आहे. ती कधीही खचण्याजोगी आहे.
बॉक्स
दरडीला हवी तीन टप्प्यांची उतरंड
आतापर्यंत अनेकदा दरड खचली. दरडीचा मलबा, मोठे दगड रस्त्यावर पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवासी घाबरतात. याबाबत अनेकदा ओरड झाली; परंतु कंत्राटदार तसेच बांधकाम विभागाने फारसे मनावर घेतले नाही. घाट बांधताना वनविभागाने व्यत्यय आणला होता. मोजकीच जागा रस्त्यासाठी दिल्यामुळे दरड सरळच ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. परिणामी ही दरड तांत्रिकदृष्ट्या सोयीची झाली नाही. त्या दरडीला तीन टप्यात उतरंड ठेवणे पूरक ठरले असते.