नाट्यगृह परिसरातील पुतळ्याचे सौंदर्यीकरण
By admin | Published: April 9, 2016 02:41 AM2016-04-09T02:41:57+5:302016-04-09T02:41:57+5:30
बसस्थानक चौकाशेजारी गार्डन रोडवर नगरपरिषदेतर्फे भव्य आणि देखणे नाट्यगृह उभारले जात आहे.
४२ लाख आले : पादचारी मार्ग, कुंपण करणार
यवतमाळ : बसस्थानक चौकाशेजारी गार्डन रोडवर नगरपरिषदेतर्फे भव्य आणि देखणे नाट्यगृह उभारले जात आहे. नाट्यगृहाच्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला जाणार आहे. या पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण आणि याठिकाणी बालोद्यान उभारण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून ४२ लाख रुपये देण्यात आले आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. नगर परिषदेतर्फे शहरात भव्य नाट्यगृह बांधण्यात येत आहे. नाट्यगृहाच्या परिसरात बरीच मोकळी जागा आहे. तेथे चांगले उद्यान व अन्य बाबी निर्माण केल्यास एक देखणे ठिकाण यवतमाळकरांना उपबल्ध होऊ शकते, ही बाब लक्षात घेता पालकमंत्री संजय राठोड यांनी नाविण्यपूर्ण योजनेतून या कामासाठी ४२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नाट्यगृहाच्या मोकळ्या जागेत बालोद्यान उभारले जाणार आहे.
नाट्यगृहात येणाऱ्या श्रोत्यांसाठी पादचारी मार्ग विकसित केला जाणार आहे. तसेच परिसराला पक्क्या भिंतीचे कुंपणही या निधीतून निर्माण करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. नाट्यगृह परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा उभा राहणार आहे. लवकरच सौंदर्यीकरणाचे काम होणार असून देखणे नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
(स्थानिक प्रतिनिधी)