ग्राहक बनून आले आणि आठ लाखांचे सोने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 05:00 AM2020-10-07T05:00:00+5:302020-10-07T05:00:21+5:30
गणपती मंदिर परिसरात अनेक सुवर्ण कारागिर आहे. तेथे दागदागिने घडविण्याचे काम केले जाते. याच परिसरातील महाकाली मंदिराजवळ असलेल्या संजय शिवकुमार सामंत या कारागिराकडे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दोघे जण आले. त्यांनी ३०० मिली सोने पाहिजे आहे, अशी विचारणा केली. सकाळची वेळ असल्याने कारागिराच्या दुकानातही गर्दी नव्हती. कारागिर ३०० मिली सोने मोजून दिले. दोन हजार रुपये घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील गणपती मंदिर परिसरातील एका सुवर्ण कारागिराकडे दोघे जण ग्राहक बनून आले. त्यांनी दोन हजार रुपयांचे सोने खरेदीचा व्यवहार केला. याच दरम्यान हात चलाखीने दुकानात ठेवून असलेल्या १६५ ग्रॅम सोने लंपास केले. हा प्रकार त्या कारागिराला उशिरा लक्षात आला. तोपर्यंत या दोन्ही ग्राहकांनी पोबारा केला होता.
गणपती मंदिर परिसरात अनेक सुवर्ण कारागिर आहे. तेथे दागदागिने घडविण्याचे काम केले जाते. याच परिसरातील महाकाली मंदिराजवळ असलेल्या संजय शिवकुमार सामंत या कारागिराकडे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दोघे जण आले. त्यांनी ३०० मिली सोने पाहिजे आहे, अशी विचारणा केली. सकाळची वेळ असल्याने कारागिराच्या दुकानातही गर्दी नव्हती. कारागिर ३०० मिली सोने मोजून दिले. दोन हजार रुपये घेतले. हे दोन्ही ग्राहक दुकानातून निघून गेले. दरम्यान, संजय सामंत याला दुकानातील सोने ठेवलेला डब्बा दिसला नाही. १६५ ग्रॅम सोने असलेला स्टिलचा डब्बा गायब होता. त्याला संशय आल्यानंतर त्याने शोधाशोध केली. मात्र तो डब्बा ग्राहक बनून आलेल्या त्या दोघांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यामध्ये विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून हे दोन चोर आल्याचे स्पष्ट झाले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या दोघांचे चेहरेही स्पष्ट आले आहेत. पोलिसांनी रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची खातरजमा केली. मात्र सीसीटीव्ही दिसणारे दोन्ही चेहरे नवीन असून ते बाहेरगावचे असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सराफा कारागिराकडे इराणी टोळीप्रमाणे गुन्हा
साधारणत: ग्राहक बनून चोरी करण्याचे प्रकार ही इराणी टोळी अवलंबते. सराफा कारागिराकडे झालेली चोरीची घटना ही त्याच पद्धतीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत आहे. इराणी टोळीतील सदस्य गोरपान व धिप्पाड असतात. यवतमाळातील गुन्ह्यात आढळलेले दोन्ही संशयित साधारण देहयष्टीचे असल्याचे दिसून आले. तूर्त पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजव्यतिरिक्त कुठलाही सुगावा लागलेला नाही.
टांगा चौकातील दुकानात दोन लाखांची चोरी
सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने टांगा चौकातील बॅटरीच्या दुकानाचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. दुकानात असलेली दीड लाख रोख व काही बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या. २४ तासात मेनलाईन परिसरात चोरट्यांनी दहा लाखांच्या वर मुद्देमाल लंपास केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बॅटरी दुकानात चोरीच्या घटनेची तक्रार सचिन पालडीवाल यांनी दिली. या प्रकरणी वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.