विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे परीक्षा केंद्रांची व्यवस्था कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 08:49 PM2019-04-27T20:49:40+5:302019-04-27T20:50:22+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक ‘रिसेट’ करताना स्थानिक महाविद्यालयांवर विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बोझा लादण्यात आला. ऐनवेळी आसनव्यवस्था कोलमडली. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. यामुळे संतप्त पालक प्राध्यापकांवर बरसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक ‘रिसेट’ करताना स्थानिक महाविद्यालयांवर विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बोझा लादण्यात आला. ऐनवेळी आसनव्यवस्था कोलमडली. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. यामुळे संतप्त पालक प्राध्यापकांवर बरसले. तर काही विद्यालयांना आसनव्यवस्था वाढवावी लागली. हा गुंता चिघळू नये म्हणून सिनेट सदस्यांना परीक्षा केंद्रावर धाव घ्यावी लागली.
जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये शनिवारी प्रचंड गोंधळाची स्थिती होती. प्रत्येक महाविद्यालयामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी होते. यामुळे एका टेबलवर दोन विद्यार्थी बसविले गेले. जादा विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था करताना अतिरिक्त वेळ वाया गेला. यामुळे परीक्षेचे वेळापत्रक बदलावे लागले.
नंदूरकर महाविद्यालयात वेळापत्रक बदलावे लागले. त्याचप्रमाणे कला आणि वाणिज्य महाविद्यालयातही पेपर देताना वेळ झाला. या विद्यार्थ्यांना नंतर वेळ वाढवून देण्यात आला. नंदूरकर विद्यालयाची क्षमता ५०० विद्यार्थ्यांची असताना ९०० विद्यार्थी बसविले होते. कला वाणिज्य महाविद्यालयाची क्षमता ५५० विद्यार्थ्यांची असताना १२२५ विद्यार्थी बसविले होते. अणे महिला महाविद्यालयाची क्षमता ७०० विद्यार्थ्यांची असताना ९०० विद्यार्थी बसविण्यात आले.
अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही महाविद्यालयांची होती. यामुळे केंद्रप्रमुख आणि प्राध्यापकांवर चांगलाच ताण वाढला होता. गर्दी नियंत्रित करण्यासोबत परीक्षा सुरळीत करण्याची दुहेरी जबाबदारी प्राध्यापकांना पार पाडावी लागली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून ढिसाळ नियोजन झाल्यामुळे महाविद्यालयांवर ताण आला. महत्वाचे म्हणजे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना भर उन्हात मनस्ताप सहन करावा लागला.
ग्रामीण भागात लिंक नसल्याने अडचणी
यावेळी विद्यापीठाने पेपरचे गठ्ठे पाठविण्याऐवजी एकच आॅनलाईन प्रत पाठविली. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आॅनलाईन पेपरची प्रिंट काढताना ग्रामीण भागात लिंक नसणे हा प्रकार वारंवार घडतो. यासोबतच विजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे निर्धारित वेळेत पेपरची प्रिंट काढताना मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे विद्यापीठाने पूर्वीप्रमाणे पेपर पाठवून परीक्षा घ्यावी, असे मत बहुतांश केंद्रप्रमुखांनी विद्यापीठाकडे नोंदविले आहे.
विद्यार्थ्यांची नव्हे केंद्रप्रमुखांचीच परीक्षा
शनिवारची संपूर्ण स्थिती हाताळणे म्हणजे केंद्रप्रमुखांचीच परीक्षा पाहण्यासारखा प्रकार असल्याचे मत केंद्रप्रमुखांनी नोंदविले. विद्यापीठाने स्थानिक साधन सामुग्री आणि आसनव्यवस्था लक्षात घेऊन निर्णय घ्यावे, असे मत नोंदविले आहे. विद्यापीठ हा विषय किती गांभीर्याने घेते, त्यावरच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पुढील पेपरचे नियोजन अवलंबून आहे.
महाविद्यालयाची गंभीर स्थिती विद्यापीठाला वारंवार सांगितली. यानंतरही प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न झाले नाही. झेरॉक्ससाठी विद्यापीठाला निधी मागण्यात आला. मात्र मिळाला नाही. अनेक केंद्रावर रेंजचा प्रश्न असल्याचे विद्यापीठाच्या लक्षात आणून दिले. यानंतरही दखल घेतली गेली नाही. महाविद्यालयाच्या क्षमतेकडे लक्ष न देता निर्णय घेतला गेला. यातून महाविद्यालयेच अडचणीत सापडली.
- विवेक देशमुख
सिनेट सदस्य, अमरावती विद्यापीठ