राजकीय पदाधिकाऱ्यांचा राडा; निवासी डॉक्टर गेले संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:50 PM2024-08-06T17:50:19+5:302024-08-06T17:51:41+5:30
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार: सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी रात्री एका रुग्णाच्या उपचारांवरून राजकीय पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राडा केला. अपघात कक्षात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरला धमकाविले. या घटनेनंतर निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच मार्ड संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले. दोषींवर कारवाई केली जावी, यापुढे रुग्णालय परिसरात संरक्षण मिळावे ही मागणी लावून धरण्यात आली. कॉलेज कौन्सिलच्या बैठकीनंतरही सोमवारी सायंकाळपर्यंत आंदोलन सुरूच होते.
वैद्यकीय महाविद्यालयात अपघात कक्षात वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी व अपघात कक्ष अधिकारी सेवा देतात. रविवारी रात्री ९:३० वाजता एक रुग्ण येथे आला. त्या रुग्णाची तपासणी करून त्याला अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. मात्र, येथे उपचार मिळत नाही सांगून परत त्या रुग्णाला अपघात कक्षात आणण्यात आले. तेथे काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी पोहोचले व त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून पदाधिकाऱ्यांनी उपस्थित डॉक्टरांना धमकाविणे सुरू केले. मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत कारवाई केली जाईल, असेही सांगितले. सातत्याने असा प्रकार रुग्णालयात होत असून, यासाठी रुग्णालय प्रशासन कोणतीच उपाययोजना करीत नाही, असा रोष मार्ड संघटनेने व्यक्त केला. त्यानंतर रात्रीपासूनच कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी, आंतरवासिता विद्यार्थी व एमबीबीएसचे विद्यार्थी कामबंद आंदोलनात सहभागी झाले. यामुळे रुग्णालयातील संपूर्ण व्यवस्था कोलमडली होती.
मार्डच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रभारी अधिष्ठाता डॉ. रवींद्र राठोड यांनी तातडीने कॉलेज कौन्सिलची बैठक बोलाविली. या बैठकीत मार्डचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत ठरल्यानुसार झालेल्या घटनेची तक्रार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार हे रविवारी रात्री घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात पोहोचले होते. या संदर्भात राडा करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सोमवारी सायंकाळी सुरू होती.
राजकीय स्टंटबाजांमुळे मेडिकलमध्ये समस्या
सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशा स्थितीत आपण जनतेसाठी किती दक्ष आहोत, ही दाखविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यातूनच रविवारी रात्री आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्याने रुग्णालयात स्टंटबाजी केल्याची चर्चा आहे. हा प्रकार निवडणुका येताच वाढीस लागला आहे. रुग्णालयात गरीब व सामान्य रुग्णांना अनेक अडचणी आहेत, येथील डॉक्टरांची रिक्त पदे, जीवनावश्यक औषधांचा तुटवडा, तंत्रज्ञ नसल्याने बंद पडणाऱ्या मशिनरी, स्वच्छतेचा प्रश्न या मुद्द्यांकडे हे स्टंटबाज लक्ष देत नाहीत, केवळ वाद व राडा करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारामुळे सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या अडचणी आणखी वाढत आहे.