गणपती विसर्जनाला गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला, १४ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 02:48 PM2021-09-20T14:48:20+5:302021-09-20T14:50:58+5:30
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या भाविकांवर तळ्याला लागून असलेल्या मोहाच्या झाडावरील मधमाशांनी हल्ला केला. सर्वांची भीतीने तारांबळ उडाली. यात महिला व मुलांसह १४ भाविक जखमी झाले.
यवतमाळ : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला करून १४ भाविकांना जखमी केले. ही घटना मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथे दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्याने गावात काही काळ भीतीचे वातावरण तयार झाले होते. जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, यात कोणीही फारशे गंभीर जखमी नसल्याने उपचारानंतर सर्वांना सुटी देण्यात आली.
मंगेश मिलमिले व छत्रपती घुंगरूड (रा. सालेभट्टी) यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली. रविवारी गणेश विसर्जन करण्यात आले होते. गावातील बळीराम लोणसावळे यांच्या शेतामध्ये असलेल्या शेततळ्यात गणेश विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. भजन, दिंडीसह निघालेल्या गणेश विसर्जन रॅलीत गावातील लहान मुले, महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
विसर्जनस्थळी पोहोचताच तळ्याला लागून असलेल्या मोहाच्या झाडावरील आग्या मोहोळच्या माशांनी भाविकांवर हल्ला केला. जीवाच्या भीतीने भाविक सैरभैर झाले. सर्वांची भीतीने तारांबळ उडाली. यात महिला व मुलांसह १४ भाविक जखमी झाले. या सर्व जखमींना तत्काळ एका खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात फारशे कोणीही गंभीर नसल्याने उपचारानंतर सर्व भाविकांना रात्री उशिरा सुटी देण्यात आली.