कापूस घरात येण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; दरात तेजीची शक्यता, आत्ताच भाव १० हजार पार
By रूपेश उत्तरवार | Published: September 5, 2022 11:44 AM2022-09-05T11:44:03+5:302022-09-05T11:45:29+5:30
मान्सूनपूर्व लागवडीतील कापसाचा वेचा बाजारात आला. गणेश चतुर्थीला जळगाव जिल्ह्यात कापसाच्या खरेदीचा शुभारंभ झाला.
यवतमाळ : यावर्षी सर्वत्र कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात दर वाढण्याचा अंदाज आहे. हीच बाब हेरून कमी दरात कापूस खरेदी करता यावा या उद्देशाने गावखेड्यात कापूस निघण्यापूर्वीच व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स बुकिंग केले जात आहे.
मान्सूनपूर्व लागवडीतील कापसाचा वेचा बाजारात आला. गणेश चतुर्थीला जळगाव जिल्ह्यात कापसाच्या खरेदीचा शुभारंभ झाला. यादिवशी ११ हजार ते १६ हजार रुपये क्विंटलपर्यंतचे दर विविध बाजारपेठेत राहिले. विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस बाजारपेठेत येण्यास अजून अवधी आहे. या दोन्ही प्रांतात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. यातून कापूस प्रांतात लाखो हेक्टर क्षेत्र नष्ट झाले.
यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात हे क्षेत्र जवळपास तीन लाख हेक्टरच्या घरात आहे. इतर कापूस क्षेत्राला अतिपावसाने फटका बसला आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. नंतरच्या काळात उन्हाचा तडाखा अधिक राहिला. यातून कापसाची पातीगळ मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे कापसाचे एकरी उत्पादनही घटणार, अशी स्थिती सर्वत्र आहे.
परदेशातही उत्पादन घटणार
बाहेर देशांतही यंदा उष्णतेची लाट आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये कापसाचे उत्पादन घटणार आहे. सिंध प्रांतात आलेल्या पुराने कापसाचे अर्धेअधिक क्षेत्र क्षतिग्रस्त झाले आहे. यामुळे या ठिकाणच्या कापूस उत्पादनाला यावर्षी फटका बसण्याचा धोका आहे. यामुळे कापूस गाठी पुरविण्याचे सौदे घेणारे व्यापारी आतापासून कामाला लागले आहेत.
१० ते ११ हजार रुपये क्विंटल दराने टाेकन
व्यापाऱ्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गाठण्यास सुरुवात केली आहे. खेडा खरेदी करणारे व्यापारी यासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला वेचा मिळावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केले आहे. १० ते ११ हजार रुपये क्विंटल दराने टाेकन शेतकऱ्यांना दिले जात आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात कापूस मिळविण्याचा मार्ग व्यापाऱ्यांनी मोकळा केला आहे.
खेडा खरेदीच्या माध्यमातून व्यापारी असे बुकिंग करतात. मोठ्या व्यापाऱ्यांनी असे बुकिंग केले नाही. यावर्षी उत्पादन नसल्याने कापसाचे दरात तेजी राहण्याची शक्यता जास्त आहे. - शुभम जैन, व्यापारी
शासकीय कापूस खरेदीसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला जाणार आहे. शासकीय दराने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक केंद्र मिळावे असा प्रस्ताव राहणार आहे. मात्र, कापसाचे शासकीय दर खुल्या बाजारापेक्षा कमी आहेत. - राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ
हरियाणामध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. त्या ठिकाणी क्विंटलला १० हजार रुपये भाव मिळाला आहे. बाजार समितीकडे कापूस आलेला नाही.
- सुधीर काेठारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट