सदृढ समाज स्वास्थ्यासाठी विजयबाबूंची धडपड प्रेरणादायी
By admin | Published: September 19, 2016 01:02 AM2016-09-19T01:02:50+5:302016-09-19T01:02:50+5:30
समाजातील शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विजयबाबूंची सुरू असलेली धडपड आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,
मदन येरावार : खासदार विकास निधीतील अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
यवतमाळ : समाजातील शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विजयबाबूंची सुरू असलेली धडपड आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, सामान्य प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.
विजय दर्डा यांनी स्थानिक खासदार विकास निधीतून येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री मदन येरावार म्हणाले, विजयबाबूंनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवा दर्जेदार करण्यावर भर दिला. त्यांच्याच निधीतील रुग्णवाहिका येथे आहे. आता ही अत्याधुनिक रुग्णवाहिका देऊन गोरगरीब रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले आहे. अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण होत आहे. या रुग्णवाहिकेचा उपयोग गोरगरीब रुग्णांसाठीच व्हावा. प्रत्येक रुग्णाला येथे व्हीआयपी ट्रिटमेंट मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रुग्णाला नातेवाईक समजून सेवा द्या -विजय दर्डा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणारे रुग्ण हे गोरगरीब असतात. त्यांना आपले नातेवाईक समजून सेवा द्या, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले. सर्व सेवांमध्ये रुग्णसेवा हे महान कार्य आहे. सामान्य रुग्णांचे शासकीय रुग्णालय हेच एकमेव आशास्थान असते. डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहून सेवा द्यावी, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेले वैद्यकीय महाविद्यालय स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा तत्कालीन आरोग्य मंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी आणले. त्यासाठी इतरही जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिली. (कार्यालय प्रतिनिधी)
बाबूजींच्या पुण्यतिथीदिनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बेरीयाट्रिक सर्जन यवतमाळात सेवा देणार- विजय दर्डा
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शस्त्रक्रिया गृह सुविधांसह उपलब्ध करून दिल्यास स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पुण्यतिथीदिनी २५ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बेरीयाट्रिक सर्जन डॉ. मुफझल लकडावाला यांची यवतमाळात नि:शुल्क सेवा देण्याची तयारी विजय दर्डा यांनी रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी बोलून दाखविली. डॉ. लकडावाला यांनी दहा वर्षाआतील शस्त्रक्रियेद्वारे मधुमेह पूर्णत: बरा करण्याचा दावा केला आहे. बेरीयाट्रिक सर्जरीसाठी अडीच ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो, ही महागडी शस्त्रक्रिया गरीब रुग्णांना नि:शुल्क करुन दिली जाईल. त्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, ना. मदन येरावार आणि अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी सुविधांसह रुग्णालय उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन दर्डा यांनी केले. यावेळी ना. येरावार व डॉ. राठोड यांनी शस्त्रक्रिया शिबिरासाठी सहकार्य देण्याचे मान्य केले.