महालातल्या गोड राजकन्येच्या वाट्याला भयाण एकांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:14 PM2018-03-18T23:14:55+5:302018-03-18T23:14:55+5:30

टुमदार महालात जन्मलेल्या गोड राजकुमारीच्या वाट्याला अचानक भयाण एकांतवास यावा, असेच घडले! तिचे निरागस डोळे राजकन्येचेच.

Behind the silence of the sweet princess of the Mahila | महालातल्या गोड राजकन्येच्या वाट्याला भयाण एकांत

महालातल्या गोड राजकन्येच्या वाट्याला भयाण एकांत

Next
ठळक मुद्देसमाजाने व्हावे नातेवाईक : आई-आजोबाच्या मृत्यूनंतर माहीच्या डोळ्यात अश्रू, ओठात आक्रोश

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : टुमदार महालात जन्मलेल्या गोड राजकुमारीच्या वाट्याला अचानक भयाण एकांतवास यावा, असेच घडले! तिचे निरागस डोळे राजकन्येचेच. पण तिच्या डोळ्यात आईची प्रतीक्षा अन् ओठात ‘आई कुठे आहे’ एवढाच आक्रोश आहे. तिचे नाव माही अन् आज तिच्या अवतीभवती कुणीच नाही!
हो, शनिवारच्या अपघातात बचावलेल्या चिमुकलीचीच ही करुण कहाणी आहे. पुष्पकुंज सोसायटीतले हे गोड पुष्प माही हेपट. शनिवारी आई आणि आजोबासोबत दुचाकीवर जाताना नियतीने डाव साधला. भीषण अपघातात आई अंजली हेपट आणि आजोबा डॉ. वामन हेपट दोघेही गेले. पण चिमुकली माही बाजूला पडली. बचावली. मृत्यूने तिला टाळले, पण आता जीवनाचे जंजाळात हे लेकरू एकटे अडकले आहे.
तिचा जन्म झाला तेव्हा तिला चटकन् कडेवर उचलून घेणाऱ्या नातेवाईकांची अवतीभवती वर्दळ होती. पण मृत्यूने माहीच्या नातेवाईकांचा सतत पाठलाग चालविला. अन् हे सर्व मृत्यू एक-दोन वर्षांच्या अंतराने बरोब्बर फेब्रुवारी-मार्च याच काळात झाले. माहीचे आजोळ मुकटा (ता. मारेगाव) गावचे. ती लहान असताना मुकटाची आजी दगावली. त्यानंतर मामा शेखर धवस यांचा अपघाती मृत्यू झाला. काही दिवसातच यवतमाळची आजी दगावली. हे दु:ख संपत नाही तोच माहीचे वडील समीर हेपट यांचाही मृत्यू झाला. आता निवृत्त डॉक्टर असलेले आजोबा आणि आई एवढेच कवच माहीला उरले होते. तेही शनिवारी काळाने हिरावून नेले.
माहीच्या आईचे वृद्ध वडील बाबाराव धवस रविवारी विषण्ण मनाने माहीविषयी बोलत होते. ते म्हणाले, डॉक्टरसाहेब म्हणायचे माहीला कलेक्टरच बनविन. आता डॉक्टरच निघून गेले. माही चंट आहे, हट्टीही आहे. यंदा तिला नर्सरीत टाकण्याचा विचार सुरू होता. ती जाईल शाळेत आणि तिच्या आजोबांचे स्वप्नही नक्कीच पूर्ण करेल....
नियतीचा असाही ‘करिश्मा’
माहीचे वडील मरण पावल्यानंतर मावशी करिश्मा गेल्या वर्षभरापासून माहीजवळच राहात आहे. आईपेक्षाही अधिक ती मावशीच्याच सहवासात राहिली. काल आई गेली, तेव्हापासून तर मावशी माहीची सावलीच झाली आहे. पण आता मावशीच्या लग्नासाठी स्थळ शोधणे सुरू आहे. आज ना उद्या मावशीही आपल्या सासरी जाईल. तेव्हा माहीचे काय, हा प्रश्न निर्माण होणारच आहे. माही म्हणजे जग. पण माहीच्या जगात ती एकटीच आहे. मृत्यू पाहिलेल्या या चिमुकलीपुढे जीवन जगण्याचा प्रश्न आहे. समाजाने तिचे नातेवाईक व्हावे. तिला कडेवर घ्यावे. तिचे हट्ट पुरवावे. तिला प्रेमाने रागवावे. दिशा दाखवावी...
यवतमाळकरांचा तातडीचा ‘प्रतिसाद’
शनिवारी डॉ. वामन हेपट आणि अंजली हेपट यांचा जीवघेणा अपघात झाल्याचे कळताच यवतमाळकर मदतीला धावून गेले. प्रतिसाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी चिमुकल्या माहीला प्रथम डॉ. कासारे यांच्या दवाखान्यात भरती करून उपचार सुरू केले. डॉ. हेपट यांच्या दोन विवाहित मुली पुणे येथे असल्याने त्यांना येण्यास १२ तास लागणार होते. त्यामुळे प्रतिसाद फाउंडेशननेच अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून पुढाकार घेतला. रविवारी सकाळीच उपाध्यक्ष बिपीन चौधरी, योगेश धानोरकर, देवेंद्र कळसकर यांनी उत्तरीय तपासणीसाठी धावपळ केली. नातेवाईकांना पाणी, स्मृतिरथ, शामियाना अशी सर्व व्यवस्था केली. आता हीच तडफ चिमुकल्या माहीच्या उज्ज्वल जीवनासाठी हवी आहे.

Web Title: Behind the silence of the sweet princess of the Mahila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.