बेंबळाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 05:00 AM2021-09-10T05:00:00+5:302021-09-10T05:00:16+5:30
बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. हा संपूर्ण परिसर बेंबळाच्या कॅचमेंट एरियात येतो. यानंतरही ही जमीन बेंबळा प्रकल्प कार्यालयाने संपादित केली नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेंबळा प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून यवतमाळ जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारात बॅक वॉटरचे पाणी जात आहे. यामुळे खरिपातील पीक नेस्तनाबूत होत आहे. याच प्रमुख कारणाने शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन प्रकल्पात घ्यावी, अशी मागणी करीत नुकसान भरपाईचीही मागणी केली.
बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. हा संपूर्ण परिसर बेंबळाच्या कॅचमेंट एरियात येतो. यानंतरही ही जमीन बेंबळा प्रकल्प कार्यालयाने संपादित केली नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शेतजमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. यावर्षीही बॅक वाॅटरचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याशिवाय शेतजमीन संपादित करण्याची कारवाई तत्काळ करावी, अशी मागणी करणारे निवेदन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे सादर केले आहे.
बॅक वॉटरमुळे विनोद अतकरे, गोविंद अतकरे, रूपराव गिरटकर, राजू नागरीकर, तीर्थेश कुमार जैन, रवींद्र विरूळकर, शैलेश जयस्वाल, जुबेर हुसेन अली, विजय देशमुख, शरद बंग, मनोहर बनसोड, निलोफर अहमद, फातिमाबी शेख रहीम, अय्याज नूर मोहम्मद यांच्या शेताचे नुकसान झाले आहे. तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.