राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच ‘मुद्रा लोन’चे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:25 PM2020-06-09T12:25:50+5:302020-06-09T12:29:39+5:30

परतफेड न झाल्याने देशात सहा लाख ५० हजार कोटींचे मुद्रा लोन बुडित खात्यात जात आहे. बहुतांश जिल्ह्यात सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेते, खासदार-आमदार व पदाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना या कर्जाचे वाटप केले गेले.

Beneficiaries of 'Mudra Loan' are activists of political parties | राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच ‘मुद्रा लोन’चे लाभार्थी

राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच ‘मुद्रा लोन’चे लाभार्थी

Next
ठळक मुद्देनेते-पदाधिकाऱ्यांची बँकांकडे शिफारस कर्जाचा वापर व्यवसायाऐवजी वैयक्तिक कामासाठी

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी आणलेल्या ‘मुद्रा लोन’ या योजनेचा बहुतांश लाभ राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच घेतला. नेत्यांनीही त्यासाठी बँकांकडे मौखिक शिफारसी केल्या. त्यामुळेच परतफेड न झाल्याने देशात सहा लाख ५० हजार कोटींचे मुद्रा लोन बुडित खात्यात जात आहे.
गेल्या पाच वर्षात १९ कोटी २४ लाख लाभार्थ्यांना नऊ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे मुद्रा लोन वितरित केले गेले. त्यासाठी कोणतीही हमी अथवा तारण घेतले गेले नाही. या कर्जाची परतफेड जवळजवळ थांबली आहे. त्यामुळे यापैकी सहा लाख ५० हजार कोटींचे कर्ज आत्ताच बुडल्यात जमा आहे. व्यवसाय चालविण्याच्या नावाने हे कर्ज घेतले गेले. प्रत्यक्षात ते घर खर्चात अर्थात वैयक्तिक कामासाठी वापरले गेले. कित्येकांना पीकअप व्हॅन घेण्यासाठी हे कर्ज देण्यात आले. बहुतांश जिल्ह्यात सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेते, खासदार-आमदार व पदाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना या कर्जाचे वाटप केले गेले.

बँकांनी योजनेची माहिती दडविली
राष्ट्रीयीकृत बँकांनी मुळात मुद्रा लोन योजनेची माहितीच सामान्य जनतेपर्यंत पोहोचू दिली नाही. राजकीयांनीच त्याचा लाभ उठविला. कित्येक नेत्यांनी तर आपल्या दुकान-हॉटेल-प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या नावाने या कर्जाची परस्पर उचल केल्याचीही माहिती आहे.

प्रत्येक बँकेचा एनपीए २० टक्क्यांवर
व्यवसाय सुरू केला, पण चालला नाही, अशी कारणे सांगून या कर्जाची परतफेड थांबविली गेली आहे. मुद्रा लोनची परतफेड थांबल्याने प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकेचा एनपीए २० टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकार मात्र बँकांचा सरासरी एनपीए अवघा तीन टक्के असल्याचे सांगून वास्तव दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.

१९ कोटींचा वाटप, मग बेरोजगारी कशी ?
देशात १९ कोटी २४ लाख लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी नऊ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे मुद्रा लोन वितरित करून सरकार योजना यशस्वी झाल्याचे सांगत आहे. १९ कोटी लोकांना कर्ज वाटप केले तर मग देशात आजही बेरोजगारी कायम कशी, तेवढी रोजगार निर्मिती का झाली नाही, असा मुद्दा या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. २०२५ पर्यंत मुद्रा लोनचा एनपीए हा बँकींग क्षेत्रातील सर्वात मोठी देयता (लायबिलीटी) ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकांनी मुद्रा लोनचे वास्तव रिझर्व्ह बँकेमार्फत सरकारपर्यंत पोहोचवावे, असा सूर याच क्षेत्रातून पुढे आला आहे.

२० लाख कोटींचे बँकांवर नवे संकट
कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यासाठी केवळ २५ हजार कोटी रुपयांचा निधी सरकारने उभारला आहे. उर्वरित वाटा बँकांनी कर्जाच्या माध्यमातून उचलण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. २५ हजार कोटी रुपयांमध्येही मुद्रा लोनचा सहा लाख ५० हजार कोटींचा एनपीए कसा अ‍ॅडजेस्ट करायचा यावर चिंतन केले जात आहे.

Web Title: Beneficiaries of 'Mudra Loan' are activists of political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार