मारेगाव तालुक्यात बायोमेट्रिक मशीनचे तीनतेरा, ठसे स्कॅन होत नसल्याने लाभार्थी त्रस्त : माहिती भरता येत नसल्याने राशन दुकानदारांनाही मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:38 AM2021-07-26T04:38:19+5:302021-07-26T04:38:19+5:30
पूर्वी रेशन दुकानात सुरू असलेला अनागोंदी कारभार आणि योग्य लाभार्थ्याना माल दिला की नाही, याची ऑनलाइन माहिती शासनाला देण्याकरिता ...
पूर्वी रेशन दुकानात सुरू असलेला अनागोंदी कारभार आणि योग्य लाभार्थ्याना माल दिला की नाही, याची ऑनलाइन माहिती शासनाला देण्याकरिता राशन दुकानात बायोमेट्रिक मशीन वापरणे बंधनकारक केले आहे. या मशीनवर लाभार्थ्याची संपूर्ण माहिती आणि डाटा अपलोड करण्यात आला. त्यामुळे ज्या-ज्या महिन्यात रेशनचा माल त्याच लाभार्थ्याने उचलला आहे काय? याची ऑनलाइन माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळत असते. परंतु आता ही पद्धत तालुक्यात रेशनधारकांसाठी मारक तर, दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरू पाहात आहे. विविध कारणाने रेशनधारकांची बोटे बायोमेट्रिक मशीनवर स्कॅन होत नाही. अनेक लाभार्थी आता वयोवृद्ध आहे, असा लाभार्थ्याची बोटे मशीनवर स्कॅन होत नाही. त्यामुळे हे लाभार्थी धान्यापासून वंचित राहात आहे. ज्या लाभार्थ्याची बोटे स्कॅन होत नाही, अशा लाभार्थ्याच्या वारसांचे नावे मशीनमध्ये अपलोड करण्यासाठी राशन दुकानदारानी प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला. परंतु अनेक महिन्यांपासून शासनदप्तरी तो प्रस्ताव पडून असल्याची माहिती राशन धान्य दुकानदार संघटनेने दिली. आजही तालुक्यातील ग्रामीण भागात मोबाइलला नेटवर्क नसते. त्यामुळे बायोमेट्रिक मशीन काम करीत नाही. नागरिकांना थम्ब देता येत नाही. या सगळ्या अडचणी पाहता पूर्वीप्रमाणेच राशन वाटपाला परवानगी द्यावी, अशी मागणी आता केली जात आहे.