बंगाली सुवर्णकार, गलाईवाले आता पोलिसांचे टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:36 PM2017-08-04T23:36:34+5:302017-08-04T23:37:29+5:30
चोरीतील सोन्याच्या जप्तीसाठी सराफ व्यापाºयांची एकजूट अडसर ठरत असल्याचे पाहून पोलिसांनी आता कोणतेही संघटन नसलेल्या बंगाली सुवर्णकार, सोन्याची गलाई करणाºयांना टार्गेट बनविणे सुरू केले आहे.
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चोरीतील सोन्याच्या जप्तीसाठी सराफ व्यापाºयांची एकजूट अडसर ठरत असल्याचे पाहून पोलिसांनी आता कोणतेही संघटन नसलेल्या बंगाली सुवर्णकार, सोन्याची गलाई करणाºयांना टार्गेट बनविणे सुरू केले आहे. नुकत्याच झालेल्या मंगळसूत्र चोरीतील जप्तीप्रकरणाने ही बाब उघड झाली आहे.
सराफ, सुवर्णकार बांधवांची असोसिएशन आहे. त्यांच्यावर कोणतेही संकट आल्यास ते सामूहिकपणे वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन त्याचा विरोध करतात. एखाद्या चोराने कुण्या सुवर्णकार-सराफाचे दुकान दाखवून तेथे सोने विकल्याचे सांगितल्यास पोलिसांना सहजासहजी या दुकानातून जप्ती करता येत नाही. व्यापारी थेट एसपी, महानिरीक्षकांपर्यंत जातात. राज्यभरातील सराफ-सुवर्णकार एकत्र येतात. त्यामुळे पोलिसांच्याच मागे डोकेदुखी लागते. या सर्व प्रकारातून पोलिसांनी आता नवा पर्याय शोधला आहे. बंगाली सुवर्णकार, सोन्याची गलाई करणाºयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कारण त्यांची कोणतीही युनियन नाही, त्यांच्यासाठी सराफ-सुवर्णकार रस्त्यावर उतरत नाहीत. या बंगाली सुवर्णकार व गलाईवाल्यांना एक-एकटे गाठून त्यांच्याकडून चोरीतील सोन्याची जप्ती करणे सहज शक्य होते. पोलिसांचा हा नवा फंडा नुकताच अनुभवास मिळाला.
एका अट्टल मंगळसूत्र चोराला सकाळी ७ वाजता सराफा बाजारातील एका गलाईवाल्याकडे सोने आटविताना रंगेहात पकडण्यात आले. त्याने मध्यस्थ असलेल्या एका सुवर्ण कारागिराचे नाव उघड केले. हा कारागिर व चोराला ‘बाजीराव’ दाखवित पोलिसांनी सहा ते आठ बंगाली सुवर्णकार व गलाईवाल्यांकडून सुमारे दहा गुन्ह्यातील सोन्याची जप्ती केली. हा आकडा ६०० ग्रॅमवर असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात पोलिसांनी ११८ ग्रॅमचीच जप्ती रेकॉर्डवर दाखविली आहे. विशेष असे चोर व गलाईवाल्यामध्ये मध्यस्थी करणाºया त्या सुवर्ण कारागिराला आरोपी बनविले गेले नाही. शिवाय चोरीतील सोने घेतल्याचा आरोप असलेल्या बंगाली सुवर्णकार व गलाईवाल्यांनाही आरोपी बनविण्यात आले नाही. त्यासाठी मोठी ‘उलाढाल’ केली गेली.
सराफा बाजारातूनच पोलिसांना टीप !
यातील बहुतांश बंगाली सुवर्णकार व गलाईवाल्यांनी चोरीतील सोने घेतलेले नाही, केवळ ‘बाजीराव’चा प्रसाद वाचविण्यासाठी त्यांनी जप्ती दिल्याचे सांगितले जाते. ही कारवाई एकाचवेळी न करता प्रत्येक दोन दिवसाने करण्यात आली. त्यामुळे कुणाकडून किती जप्त झाले, याची सराफा बाजारात कुणालाच खबरबात नव्हती. विशेष असे बंगाली सुवर्णकार व गलाईवाल्यांमधील ‘सक्षम’ नावांची टीप सराफा बाजारातूनच कुण्या मुखबिराने पोलिसांना दिल्याचा संशय आहे.