सावधान, 199 गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 05:00 AM2021-07-14T05:00:00+5:302021-07-14T05:00:08+5:30
जलस्त्रोताच्या जवळ उकीरडे, गटाराचे सांडपाणी, संडासचा खड्डा असे गंभीर प्रकार आढळले आहे. यामुळे पाण्याचे स्रोत दूषित झाले आहे. अशा ठिकाणी ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाने विविध उपाययोजना सांगितल्या आहे. यामध्ये जलस्त्रोताच्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर सारखे जलशुद्धीकरण करणाऱ्या औषधी वापरण्याच्या सूचना आहेत. तर काही ठिकाणी जलस्त्रोत बंद करण्याच्याही सूचना आहेत.
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोत तपासले जातात. यानंतर दूषित जलस्त्रोत असणाऱ्या ठिकाणी विविध उपाययोजना सूचविण्यात येतात. यामुळे साथरोगाला नियंत्रित करता येते. यावर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १९९ गावांचे जलस्त्रोत दूषित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे आला आहे. एकूण नमुन्यांच्या तपासणीपैकी १० टक्के नमुने दूषित आहे.
जलस्त्रोताच्या जवळ उकीरडे, गटाराचे सांडपाणी, संडासचा खड्डा असे गंभीर प्रकार आढळले आहे. यामुळे पाण्याचे स्रोत दूषित झाले आहे. अशा ठिकाणी ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाने विविध उपाययोजना सांगितल्या आहे. यामध्ये जलस्त्रोताच्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर सारखे जलशुद्धीकरण करणाऱ्या औषधी वापरण्याच्या सूचना आहेत. तर काही ठिकाणी जलस्त्रोत बंद करण्याच्याही सूचना आहेत.
कोरोना काळात जलस्त्रोत तपासणीचे काम गतवर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. अशा ठिकाणी रोटेशन पद्धतीने पाण्याचे स्त्रोत तपासले जाणार आहे. या ठिकाणी पाणी दूषित आढळले तर खबरदारी घ्यावी लागणार आहे.
कोरोनामुळे नमुने घटले
- पावसाळ्यापूर्वी गावातील पेयजलाचे स्त्रोत आरोग्य विभागामार्फत तपासले जातात. कोरोनामुळे आरोग्याची संपूर्ण यंत्रणा कोविडच्या कामातच व्यस्त होती. परिणामी जलस्रोत तपासण्याचे काम प्रभावित झाले. निर्धारित उद्दिष्टांच्या मोजक्याच स्त्रोतांचा जलस्त्रोत तपासण्यात आला.
- या नमुन्यांच्या तपासणीसाठी भूजल सर्वेक्षण विभागाची यंत्रणाही काम करीत असते. कोरोनामुळे एकूण उपस्थितीवर बंधने होती. यातून मोजकेच जलस्त्रोत तपासण्यात आले. जे जलस्त्रोत दूषित आढळले अशा ठिकाणी ग्रामपंचायतीला उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- जिल्हास्तरावर तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांच्या अहवालानंतर ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचनाही ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत.
ज्या गावांत तपासणीच झाली नाही त्यांचे काय?
ज्या गावांमध्ये पाण्याच्या नमुन्याची तपासणी झाली नाही, अशा ठिकाणी रोटेशन पद्धतीने दर महिन्याला पाण्याची तपासणी होणार आहे. यानुसार त्या ठिकाणी उपाययोजना पार पडतील.
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या !
- पावसाळ्यात जलजन्य आजाराचे मोठ्या प्रमाणात थैमान होते. यातून साथरोग पसरु शकतो. आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी या काळात पाणी उकळून पिणे सर्वाधिक चांगले आहे. यामुळे पाण्यात आलेला बॅक्टेरिया नष्ट होतो. परिणामी पाण्यापासून उद्भवणारे आजार टाळता येतात. डायरिया, काॅलरा यामुळे व्यक्तींचे आरोग्य धोक्यात येते. शरिरातील संपूर्ण पाणी कमी होते. परिणामी शरीरातील खनिज द्रव्य कमी झाल्याने व्यक्ती आजारी पडतो. तो त्याच्या जीवावर बेतू शकतो.