विधानसभेसाठी वणीत उमेदवारांची भाऊगर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:30 PM2019-07-02T21:30:58+5:302019-07-02T21:31:30+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात उमेदवारांची सर्वाधिक भाऊगर्दी वणी मतदारसंघात पहायला मिळणार आहे. तेथे पंचरंगी सामना होऊ शकतो. मुळात प्रमुख पक्षातच नियोजित उमेदवाराशिवाय इतर अनेक सक्षम चेहरे असल्याने उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच होणार आहे.
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात उमेदवारांची सर्वाधिक भाऊगर्दी वणी मतदारसंघात पहायला मिळणार आहे. तेथे पंचरंगी सामना होऊ शकतो. मुळात प्रमुख पक्षातच नियोजित उमेदवाराशिवाय इतर अनेक सक्षम चेहरे असल्याने उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच होणार आहे.
वणी विधानसभा मतदारसंघात उमेदवार भाजपचा की शिवसेनेचा आणि काँग्रेसचा की राष्टÑवादीचा असा पेच युती व आघाडीत निर्माण होणार आहे. कारण वणीमध्ये २०१४ ला पहिल्यांदाच भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार अनपेक्षितपणे निवडून आले. त्यापूर्वी ही जागा वामनराव कासावार यांच्या रुपाने काँग्रेसकडे होती. २००९ मध्ये या जागेवर शिवसेनेचे विश्वास नांदेकर निवडून आले होते. या मतदारसंघात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षाचे सक्षम उमेदवार आहेत. मात्र युती झाल्यास ही जागा भाजपला की सेनेला असा प्रश्न निर्माण होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आमदाराला पक्षाचे उमेदवार हंसराज अहीर यांना मतांची अपेक्षित आघाडी मिळवून देता आली नाही. अवघ्या दोन हजार मतांची आघाडी मिळाल्याने भाजप आणि विशेषत: अहीर समर्थकांच्या दुसऱ्या गटात आमदारांबाबत नाराजी आहे. त्यातूनच बोदकूरवार यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध व आव्हान देखील दिले जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चाने ही जागा तरुण उमेदवारासाठी पक्षाकडे मागितली आहे. एकूणच बोदकुरवारांना ‘सिटींग-गेटींग’ या एकमेव फॉर्म्युलावर पुन्हा उमेदवारी मिळविणे सोपे नाही. मात्र माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा शब्द आपल्या समर्थक व इच्छुकांपैकी कुणाच्या पारड्यात पडतो यावरही भाजपच्या तिकिटाचे गणित अवलंबून आहे. शिवसेनेतसुद्धा गटबाजी असून नांदेकरांशिवाय आणखी काही चेहरे तयारीला लागले आहेत. सेनेनेही युतीच्या वाटाघाटीत या मतदारसंघावर जोरदार दावा सांगितला आहे.
इकडे काँग्रेस व राष्टÑवादीतसुद्धा तिकिटासाठी जोरदार स्पर्धा आहे. काँग्रेसकडून परंपरागत उमेदवार वामनराव कासावाराांशिवाय अनेक नवे चेहरे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. वामनरावांना घरातूनही स्पर्धक आणि पर्याय तयार झाले आहेत.
राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर चंद्रपुरातून निवडून आले. त्यांचा शब्दही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून कुण्यातरी पक्षात एन्ट्री करण्याची संधी शोधणाºया एका सोबर चेहºयाला खासदारांनी थेट बारामतीत प्रोजेक्ट करून त्यांचे आत्ताच ‘कन्सेन्ट’ मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. विधानसभेच्या तिकिटाच्या कमिटमेन्टवर त्या नेत्याची काँग्रेसमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु काँग्रेसमधून त्यांना विरोध होतो आहे. काँग्रेसमध्ये तिकिटासाठी स्पर्धा वाढणार आहे. राष्टÑवादी काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून व पक्षातील एका ज्येष्ठ आक्रमक नेत्याच्या मैत्रीच्या बळावर हा मतदारसंघ राष्टÑवादीसाठी सोडवून घेण्याचा इच्छुकाचा प्रयत्न आहे.
वणी विधानसभा मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या भक्कम समजला जातो. कोळशाचा काळाबाजार, त्यातील वाहतूक, चोरटी विक्री व एकूणच उलाढालीतील पैसा विधानसभेत पाण्यासारखा खर्च केला जातो. आजच्या घडीला सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी या पैशाच्या जोरावरच विधानसभेचा गड काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. आपल्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी ही सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. युती व आघाडी झाल्यास वर्चस्वाच्या राजकीय लढाईतून पाडापाडी होण्याची चिन्हे वणी विधानसभा मतदारसंघातही आहे. निवडणुका स्वबळावर लढायच्या की युती, आघाडीत हे निश्चित झाल्यानंतरच इच्छुक उमेदवारांना पुढील दिशा स्पष्ट होईल, एवढे निश्चित.
मनसे, प्रहारचेही आव्हान
प्रमुख चार पक्षांशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही वणी मतदारसंघात बºयापैकी ताकद आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांपुढे मनसेचेही आव्हान राहणार आहे. युती व आघाडी न झाल्यास वणी मतदारसंघात आधीच पंचरंगी लढतीचे चित्र असताना आता त्यात प्रहारचीही भर पडणार आहे. प्रहारमधूनही विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.